राष्ट्रवादी विरोधकांना सापडेनात माढ्यात नाड्या

नागनाथ डोंबे

म्हसवड – राज्यातून सर्वपक्षीय नेतेमंडळींचे लक्ष लागून राहिलेला माढा मतदारसंघातील विरोधी गटाच्या उमेदवारांची उत्कंठा कायम आहे. हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या माढ्यात पवारांची उमेदवारी जाहीर झाल्याने विरोधक अजुनही अभ्यासपुर्ण चाचपणी करत आहेत. मोहिते समर्थकांची होत असलेली धरसोड थांबली तरी संभाव्य नाराजी नाकारता येत नाही. कोणत्याही उमेदवाराच्या नावावर विरोधकांनी अद्याप शिक्कामोर्तब केल्याचे दिसत नाही. मित्रपक्षांची रणनिती, इतर आघाड्यांचे उमेदवार अशा अनेक बाबी पडताळल्या जात असून येथील धनगर समाजाच्या मतांचा कल, विधानसभेच्या उमेदवारीचे शब्द, तळ्यात-मळ्यात करणारे नेते, अशा अनेक बाबतीतील मतदार संघातील राजकीय नाड्या तपासण्याच काम करत असताना अनेक मोहरे पुढे केले जात आहेत. राजकीय नेतेमंडळींची गुप्त खलबते सुरू आहेत. प्रमुख विरोधी पक्ष भाजपा शेवटची चाल काय खेळणार याकडे लक्ष लागले आहे. तर इतर पक्षाचे मौन कायम आहे. विरोधकांना नेमकी माढा ची नाडी सापडणार का याकडे लक्ष लागून राहिले आहे.

माढ्यात प्रामुखाने राष्ट्रवादी व भाजपा यांच्यात टक्कर होणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर एकमेकांच्या उमेदवाराचा अंदाज घेतला जात आहे. माढ्यात राष्ट्रवादीकडून विजयसिंह मोहिते-पाटील व प्रभाकर देशमुख यांच्या उमेदवारीच्या हिशोबाने मांडलेली राजकीय गणित शरद पवारांनी मैदानात उतरल्याने काही अंशी बिघडली आहेत. इतर विरोधी गटांनी हा मतदारसंघ आमचा असल्याचा दावा केलातरी विरोधकांनी मात्र उमेदवार जाहीर केला नाही. मतदारसंघात वंचित आघाडी व शेतकरी संघटना चाचपणी करत आहे. मात्र, नेमक्‍या उमेदवाराचे नाव समोर येताना दिसत नाही. शरद पवारांसारख्या तगड्या उमेदवाराला आव्हान उभे करून माढ्याची जागा आपल्या पदरात घेण्यासाठी भाजपा व मित्र पक्ष जोरदार रणनीती आखण्याचीच्या तयारीत आहेत. सध्या धनगर समाजाला आदिवासी सुविधा देऊन केलेली बोळवण, रस्ते रेल्वे हे सह काही महत्त्वाच्या प्रश्‍नांबाबत घेतलेले सकारात्मक निर्णय या या गोष्टींच्या अभ्यासात विरोधी गट मग्न आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रचाराची गती घेतल्याचे दिसत असून माढा मतदार संघात अनेक मेळावे होत आहेत. यातील घडामोडींचा राजकीय नाडी विरोधकांना अद्याप सापडत नसल्याचे दिसत आहे.

वाघमोडे अन्‌ देवकातेंची तयारी

राष्ट्रवादीच्या विरोधी गटातील उमेदवारीसाठी काही मोजकीच नावे चर्चेत दिसत आहेत. मित्रपक्ष रासपच्या महादेव जानकरांनी माढ्याचा कानोसा घेतला तर भाजपाचे सहकार मंत्री सुभाष बापू पक्षाच्या आदेशाची वाट पहात आहेत. नव्याने मैदानात उतरणारे ऍड. सोमनाथ वाघमोडे व काशिनाथ देवकाते हे उमेदवार महायुतीच्या तिकिटावर मैदानात उतरण्याची तयारी करताना दिसत आहेत. सध्या धनगर आरक्षणात अग्रस्थानी असलेले उत्तमराव जानकर यांची दिशा अद्याप स्पष्ट झालेली नसली तरी त्यांचा निर्णय काय होईल याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. याव्यतिरिक्त वंचित आघाडी स्वाभिमानी शेतकरी संघटना आधी पक्षांच्या उमेदवारांच्या हालचाली सुरू आहेत. मात्र, अद्याप अधिकृतपणे मुख्य विरोधी गटाने उमेदवाराचे नाव गुलदस्त्यात ठेवल्यामुळे विरोधी गटाच्या कार्यकर्त्यांना व उमेदवारांनाही वेट अँड वॉच करावे लागत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)