लॉकडाऊन नियमावली भंगाच्या गुन्ह्यांमुळे संख्येत मोठी वाढ
नवी दिल्ली : देशात 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये गुन्ह्यांची नोंद होण्याच्या प्रमाणात 28 टक्क्यांनी वाढ झालेली असल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या (एनसीआरबी) अहवालात नमूद करण्यात आले आहे.
2020 या वर्षात देशभरात 66 लाख दखलपात्र गुन्ह्यांची नोंद झालेली आहे. त्यातील 42.54 लाख गुन्ह्यांमध्ये भारतीय दंड संहितेची कलमे लावून नोंद झालेली आहे. उर्वरीत 23.46 लाख गुन्हे विशेष कायदे आणि स्थानिक कायद्याअंतर्गत नोंदवण्यात आलेले आहेत.
लोकसंख्येच्या प्रमाणात गुन्ह्यांचा विचार केला तर 2020 मध्ये एक लाख लोकसंख्येमागे 487.8 गुन्हे झाले आहेत. 2019 मध्ये हे प्रमाण एक लाख लोकसंख्येमागे 385.5 इतके होते.
गुन्ह्याच्या टक्केवारीत वाढ झालेली 10 राज्ये
राज्य वर्ष 2020 मधील गुन्हे 2019 च्या तुलनेतील वाढ
तमिळनाडू 8,91,700 430 टक्के
गुजरात 3,81,849 174 टक्के
आंध्र प्रदेश 1,88,997 59 टक्के
गोवा 3,393 38 टक्के
महाराष्ट्र 3,94,017 16 टक्के
मध्य प्रदेश 2,83,881 15 टक्के
तेलंगणा 1,35,885 15 टक्के
उत्तराखंड 13,812 14 टक्के
ओडिशा 1,08,533 13 टक्के
पंजाब 49,870 12 टक्के
करोनाचा परिणाम
तमिळनाडू, गुजरातसारख्या तुलनेत शांत समजल्या जाणाऱ्या राज्यांमध्ये गुन्ह्यांची टक्केवारी मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसत आहे तर गुन्ह्यांचे जास्त प्रमाण असणाऱ्या राज्यांमध्ये टक्केवारी वाढलेली दिसत नाही यामागे काय कारण आहे? मुख्य बाब म्हणजे करोनामुळे सगळ्या गोष्टी बदललेल्या आहेत. करोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल जास्त गुन्हे दाखल झाल्याने तमिळनाडू, गुजरातसारख्या राज्यांची टक्केवारी वाढलेली दिसत आहे.
वास्तविक पाहता 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये अन्य गुन्ह्यांच्या संख्येत घट झालेली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने 2020 मध्ये लॉकडाऊन आणि त्यासंदर्भातील नियमावली जाहीर केल्यानंतर त्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 6,12,179 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या विविध नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दाखल झालेल्या गुन्ह्यांची संख्या 2019 फक्त 26, 469 एवढी होती.
करोना नियमावलीचे उल्लंघन गेल्यांचे सर्वाधिक गुन्हे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये दाखल करण्यात आलेले आहेत. गुजरातमध्ये 2.28 लाख तर महाराष्ट्रात 1.4 लाख गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
कोणत्या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झालेली आहे?
गुन्ह्याचा प्रकार 2019 2020
दुसऱ्याला इजा करणे 5,45,757 5,78,641
खून 28,915 29,193
बेकायदेशीररित्या रोखणे 18,732 19,061
आत्महत्येस प्रवृत्त करणे 8,312 8,816
आत्महत्येचा प्रयत्न करणे 1,638 1,685
करोनाचा प्रभाव असलेल्या 2020 या वर्षात देशभरात पोलिसांची बहुतेक ताकद सोशल डिस्टन्सिंगचे पालन होते आहे की नाही हे पाहण्यातच गेली. जवळपास 25 टक्के गुन्हे हे शासनाने लागू केलेले नियम न पाळल्याबद्दल किंवा करोनाचा प्रसार होईल असे वागल्याबद्दलचे आहेत.
करोनामुळे न्यायालयांच्या कामकाजांवरही मोठा परिणाम झाला आणि कनिष्ठ न्यायालयातील प्रलंबित खटल्यांची संख्या करोनाच्या साथीपूर्वी 3.2 कोटी एवढी होती ती आता चार कोटींवर जाऊन पोचली आहे. 2019 पर्यंत बलात्काराचे 1.46 लाख खटले प्रलंबित होते 2020 मध्ये त्यात 23,693 प्रकरणांची भर पडलेली आहे.