ठाणे महापौरपदाच्या निवडणुकीतून राष्ट्रवादीची माघार

ठाणे : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या विनंतीवरुन राष्ट्रवादीने ठाणे महापालिका महापौर पदाच्या शर्यतीतून माघार घेतली आहे. यामुळे ठाणे महापालिका महापौर आणि उपमहापौरपदावर शिवसेनेची पकड असणार आहे.

ठाणे महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी शनिवारी (16 नोव्हेंबर) अर्ज दखल करण्यात आले. महापौर पदासाठी ठाणे महापालिकेचे सभागृह नेते आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक नरेश म्हस्के यांनी अर्ज दाखल केला. तर उपमहापौरपदासाठी शिवसेनेच्या नगरसेविका पल्लवी कदम यांनी अर्ज दाखल केला.

महापौर आणि उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीचे नगरसेवकही अर्ज दाखल करणार होते. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या विनंतीनंतर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत माघार घेतली. त्यामुळे नरेश म्हस्के यांची महापौरपदी तर पल्लवी कदम यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड निश्‍चित मानली जात आहे. येत्या 21 नोव्हेंबरला त्यांच्या निवडीची घोषणा केली जाणार आहे.

दरम्यान, राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस यांचे सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरु असताना ठाणे महापालिकेतही महासेनाआघाडीचे दर्शन घडले. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या उपास्थितीत महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यात आल्यानंतर स्वतः एकनाथ शिंदे हे विरोधी पक्षाच्या कार्यालयात जाऊन विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील आणि राष्ट्रवादीच्या इतर पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. पालिका मुख्यालयात येऊन एकनाथ शिंदे कधीच विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयात गेले नसून पहिल्यांदाच ते या कार्यालयात गेले असल्याने राज्याप्रमाणे ठाणे महापालिकेतही महासेनाआघाडीचे चित्र पाहायला मिळाले.

Leave A Reply

Your email address will not be published.