विदर्भातही राष्ट्रवादीला धक्‍का?

आमदार मनोहरराव नाईक शिवसेनेच्या वाटेवर

पुसद – लोकसभा निवडणूकीत भाजपला मिळालेल्या घवघवीत यशानंतर आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला गळती लागली आहे. त्यातच आता विदर्भातही राष्ट्रवादीला आणखी एक धक्का बसणार आहे. पुसद विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी अन्न व औषध प्रशासन मंत्री मनोहरराव नाईक हे दोन्ही मुलांसह शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मनोहरराव नाईक हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची बंधू होत.

मनोहरराव नाईक यांचे सुपुत्र इंद्रनील नाईक मंगळवारी मुंबईत शिवसेनेत प्रवेश करतील, अशी माहिती आहे. मात्र, मनोहरराव नाईक हे स्वत: शिवसेना प्रवेशाच्या जाहीर कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत. पण्‌ त्यांच्या हातावरही शिवबंधन बांधले जाईल. मनोहरराव नाईक यांच्याऐवजी त्यांचे पुत्र इंद्रनील नाईक हेच आगामी विधानसभा निवडणुकीचा पुसदमधील चेहरा असतील, अशी चर्चा आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत आघाडीसाठी पोषक वातावरण नसतानाही मनोहरराव नाईक पुसद मतदारसंघातून निवडून आले होते. त्यामुळे नाईक यांनी शिवसेनेची वाट धरल्याने विदर्भात राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.