सातारा – सातारा जावळीचे विद्यमान राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडेंकडे राजीनामा दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शिवेंद्रराजे हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरु होती. पण त्यांनी आता राजीनामा दिल्यामुळे या बातमीला दुजोरा मिळाला आहे.
तत्पूर्वी, सोमवारी साताऱ्यातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भाजप प्रवेशाचे स्पष्ट संकेत दिले होते. बैठकी दरम्यान, शिवेंद्रराजे म्हणाले की,’ आजची पिढी सोशल मीडियामुळे प्रचंड गतिमान आहे. जर मतदारसंघात मोठी कामे झाली नाही तर मतदान होणार नाही. केवळ आमदार या नात्याने मोठ्या प्रकल्पांचा पाठपुरावा करताना प्रचंड मर्यादा येतात. माझे शरद पवार व अजितदादा पवार यांच्याशी कोणतेही वाद नाहीत. सातारा मतदारसंघात मोठे विकास प्रकल्प व्हावेत, ही आमची धारणा आहे. ज्या पक्षात माझ्या कार्यकर्त्यांचा विचार होईल किंवा त्याचे हित पाहिले जाईल त्याच पक्षात मी असेन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा झाली आहे, असे सूचक विधान शिवेंद्रसिंहराजे यांनी केले होते.