लोकसभा निकालापूर्वीच राष्ट्रवादीला धक्का; माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई – लोकसभा निवडणुकीचे उद्या (ता.23) निकाल जाहीर होणार आहेत. मात्र, त्याधीच राष्ट्रवादी कॉंग्रेसला धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्याआधी दुपारी जयदत्त क्षीरसागर यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

शिवसेना भवनात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत जयदत्त क्षीरसागर यांनी अधिकृत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी जयदत्त क्षीरसागर यांना शिवबंधन बांधून त्यांचे स्वागत केले. यावेळी बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश केला.

याप्रसंगी उद्धव ठाकरे म्हणाले, एक्‍झिट पोल आणि जयदत्त क्षीरसागर यांचा प्रवेश यांचा काहीही संबंध नाही. बीड जिल्हा आम्ही थोडे दूर्लक्षित केला होता. आता, मात्र आम्ही जोरात तयारी केली आहे. जयदत्त क्षीरसागर आज सहकुटुंब, सहपरिवार शिवसेनेत आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

गेल्या वेळी प्रियांका चतुर्वेदी आल्या तेव्हा निवडणूका व्हायच्या होत्या. शिवसेनेबद्दलच्या आकर्षणापोटी आपण शिवसेनेत यायचा निर्णय घेतला. शिवसेनेसाठी बीड जिल्हा हा दूर्लक्षीत राहिला होता. तो दुष्काळी वगैरे नव्हता. पण, तशी पेरणी शिवसेनेनंच कधी केली नव्हती. मात्र, आता मराठवाड्यासाठीची मोठी जबाबदारी आणि जयदत्त क्षीरसागर यांच्या मनात असलेली जबाबदारी त्यांना मिळेल. उद्या निकाल आहेच, अवघे काही तास बाकी आहेत. सगळी उत्तरं मिळतीलच, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मागील काही दिवसांपासून आपली घुसमट होत होती, असे जयदत्त क्षीरसागर यांनी यावेळी सांगितले. शिवसेना जात-पात पाळणारा पक्ष नाही, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, उद्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यापूर्वीच शिवसेनेने राष्ट्रवादी कॉंग्रेसला खिंडार पाडली आहे. जयदत्त क्षिरसागर यांच्या सारखा दिग्गज नेता शिवसेनेत गेल्यामुळे मराठवाड्यात शिवसेनेची ताकत आणखी वाढणार आहे. सहा महिन्यांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत बीड जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात शिवसेनेत मजबूत स्थिती निर्माण झाली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.