धूळफेक करण्यासाठी पक्षाचे नाव राष्ट्रवादी ठेवले का?

नगरच्या सभेत मोदींकडून शरद पवार लक्ष्य : देश कॉंग्रेसमुक्‍त झाल्याशिवाय प्रगती नाही

विखेंच्या रूपाने कॉंग्रेसवर सर्जिकल स्ट्राइक-मुख्यमंत्री

खासदार दिलीप गांधी यांनीही चांगली कामे केली आहेत. मात्र, निवडणुकीची रणनिती म्हणून आपल्याला काही निर्णय घ्यावे लागले. त्यांना उमेदवारी मिळाली नाही, म्हणून त्यांनी नाराज होऊ नये. डॉ. सुजय विखे यांच्या रूपाने आपण कॉंग्रेसवर ‘सर्जिकल स्ट्राइक’ करण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. खा. गांधी चिंता करून नका पक्ष तुमच्या मागे उभा असून त्यांना योग्य ती संधी पक्ष देईल. असे ते म्हणाले. ओपनिंग खेळाडू म्हणून उतरले आणि नंतर न लढताच बारावा खेळाडू म्हणून मैदानातून परत निघून गेले. परंतु नगरमध्ये युवा फलंदाज देण्यात आला आहे. तो नक्‍कीच विजयी होईल असे ते म्हणाले.

नगर – जम्मू-काश्‍मीरची समस्या हे कॉंग्रेसचे पाप आहे. आता देशापासून जम्मू-काश्‍मीर वेगळे करण्याची भाषा करून देशात दोन पंतप्रधान हवे असलेल्या देण्याच्या वल्गना केल्या जात आहे. कॉंग्रेसचे ठिक आहे. पण शरद पवारांना काय झालं आहे, हे कळत नाही. तुम्ही देशाच्या नावाने कॉंग्रेस सोडली.आता देशात दोन पंतप्रधान होण्याची भाषा होत असताना तुम्ही गप्प का? कॉंग्रेसशी हातमिळवणी केल्यानंतर तुम्ही देशाला आता विदेशी चश्‍म्यातून पाहत आहात का? तुमच्या पक्षाचे राष्ट्रवादी हे नाव केवळ जनतेच्या डोळ्यात धूळ फेक करण्यासाठीच ठेवलंय का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमितले असतानाही तुम्हाला झोप कशी येते? असे सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून थेट शरद पवार पुन्हा एकदा लक्ष्य केले.

नगर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे आणि शिर्डीचे शिवसेनेचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी सावेडी येथील संत निरंकारी भवनच्या मैदानावर झालेल्या जाहीर सभेत मोदी बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री प्रा. राम शिंदे, विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी, आमदार शिवाजी कर्डिले, आमदार मोनिका राजळे, आमदार स्नेहलता कोल्हे, आमदार बाळासाहेब मुरकुटे, शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, महापौर बाबासाहेब वाकळे आदी उपस्थित होते.

मोदींनी आपल्या भाषणात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसवर सडकून टीका केली. मोदी सरकारचे पाच वर्ष आणि त्यापूर्वीच्या दहा वर्षाचे सरकार तुम्ही पाहिले आहे. ते सरकार भ्रष्टाचारी व घोटाळ्याचा निघाले. या सरकारच्या कार्यकाळात देशातील जनता भीतीच्या सावटाखाली होती. कोठेही बॉम्ब स्फोट होत होते. मुंबई, पुणे यासारख्या शहरासह अनेक ठिकाणी बॉम्ब स्फोट झाले. त्या सर्वसामान्य शेतकरी, व्यापारी, विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला. परंतू आता गेल्या पाच वर्षात या चौकीदाराची सत्ता पाहिली. बॉम्ब स्फोट कोठे गेले? यापूर्वीच सरकार कमकुवत होते. जगासमोर व पाकिस्तानसमोर हे कमकुवत सरकार काहीच करू शकत नव्हते.

आमचे जवान बदला घेण्याची मागणी करीत होते. पण हे सरकार मुग गिळून गप्प बसत होते. परंतू आता चौकीदारच्या सरकारने पाकिस्तानला घरात घुसून उत्तर दिले आहे. भारताने जगासमोर झुकणे बंद करून चुक कराल तर महागात पडेल असा इशारा दिला आहे. त्यामुळे दहशतवाद्यांना आता भारताची भिती वाटू लागली आहे, असे मोदी म्हणाले. मध्यप्रदेशमध्ये आताच सरकार आले आहे. मात्र चारही बाजूंनी पैसा गोळा करून कॉंग्रेसकडून पैशाचा वापर निवडणुकीसाठी केला जात आहे. दिल्लीमधील तुघलक रोड वरील एका बड्या नेत्यांच्या घरात सापडलेला पैसा हा पोषण आहाराचा आहे.

अजित पवार के शर्मनाक बयान है

महाराष्ट्रात आमचं सरकार मोठं काम करत आहे. पाण्यासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापण्याचा आमचा संकल्प आहे. देशातील नद्या आणि समुद्राचे पाणी कशाप्रकारे वापरात येईल, यासाठी हे मंत्रालय स्थापन करण्यात येईल. एकीकडे आमचं महायुतीच सरकार जलसिंचनची मोठी काम करत आहेत. तर दुसरीकडे कॉंग्रेस सरकारचे घोटाळे आणि “अजित पवार के शर्मनाक बयान है’, असे मोदींनी म्हटले. मोदींच्या या बोलण्याचा रोख अजित पवार यांनी धरणातील पाण्याबद्दल केलेल्या वक्तव्याकडेच होता.

घोटाळा ही कॉंग्रेसची खरी ओळख यातून झाली असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे जाहीर सभेत केला. सुरवातीला त्यांनी अहमदनगरच्या शिर्डीतील पावन भूमिला माझा नमस्कार असे बोलून भाषणाला सुरूवात केली. गेल्या निवडणुकीत या तारखेला याच मैदानावर सभा झाली होती. त्या सभेपेक्षा यावेळी मोठी गर्दी झाल्याचा उल्लेख करून माझ्यावर प्रेम व विश्‍वास दाखविल्याबद्दल त्यांनी नगरकरांना सलाम ठोकला. मोदी पुढे म्हणाले, कॉंग्रेसने भारताला आणि महाराष्ट्राला लुटे. हे लोक गरीब शेतकऱ्यांचे दुश्‍मन आहेत. त्यांनी आजवर सर्वांना फक्त जखमाच दिल्या आहेत. त्यामुळे त्यांना आता त्यांची जागा दाखवण्यासाठी तुमच्या मतांची गरज आहे. आपले एक मत या चौकीदाराला मजबूत करेल, असे मोदी यावेळी म्हणाले.

सैन्याच्या कारवाईचे श्रेय घेण्यावरुन देशात वातावरण तापलेले असताना मोदींनी या सभेत पुन्हा एकदा नवमतदारांना राष्ट्रभक्तीच्या नावाखाली भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले. राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड तुम्हाला मंजूर आहे का? असा सवाल करताना जवानांच्या शौर्यासाठी भाजपला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी येथे पुन्हा एकदा केले. दरम्यान, शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर बोलताना मोदी म्हणाले, पुन्हा सत्तेत आल्यानंतर पाण्याच्या नियोजनासाठी सत्तेवर आल्यानंतर जलशक्‍ती मंत्रालय नव्याने स्थापन करणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्‍न मिटेल. शेतकरी कृषी योजनेत बदल करणार आहोत. 60 वर्षांवरील शेतकऱ्यांना पेन्शन देणार आहोत. उसापासून इथेनॉल निर्मितीला बळ देणार आहोत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.