गडाखांच्या विजयासाठी घुलेंची राष्ट्रवादी सरसावली

गणेश घाडगे
नेवासा तालुक्‍यात माजी आ. शंकरराव गडाख यांची ताकद वाढली ः घुले गावोगावी घेणार मेळावे

नेवासा – नेवासा तालुक्‍यात विधानसभा निवडणुकीत घुले बंधू काय भूमिका घेतात, याकडे तालुक्‍याचे लक्ष लागले होते. तसेच घुले यांची ताकद कुणाच्या पारड्यात पडते, त्यावर निवडणुकीचा निकालही ठरण्याची चिन्हे आहेत. आता घुले बंधूंच माजी आ. शंकरराव गडाख यांना मदत करणार असल्याचे जाहीर केल्याने या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. तसेच घुले बंधू गडाखांसाठी गावोगावी सभा घेणार असून, त्याचा फटका आ. बाळासाहेब मुरकुटे यांना बसणार का, अशी चर्चा तालुक्‍यात सुरू आहे.

2014 च्या विधानसभा निवणुकीत गडाख-घुले या राजकारणी घराण्यांत दुरावा निर्माण झाला होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार न देता अपक्ष उमेदवार माजी आमदार शंकरराव गडाख यांना राष्ट्रवादी पक्षाचा जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घुले बंधूंनी घेतला. गडाख यांच्या विजयासाठी घुलेंची राष्ट्रवादी तालुक्‍यात सरसावली असल्याचे चित्र निर्माण झाले असून, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत संकटमोचकाच्या माध्यमातून आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना मिळालेली ताकद 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मिळणार नसल्याने आमदार मुरकुटे यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे बोलले जात आहे.

माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्याकडे उमेदवाराल विजयासाठी लागणारी ताकद असल्याने त्यांच्या निर्णयाकडे तालुक्‍याचे लक्ष लागले होते. अखेर त्यांनी उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी गडाखांना पाठिंबा जाहीर केल्याने घुले यांची रसद मुरकुटे यांना मिळणार नाही. त्यामुळे 2019 च्या विधानसभा निवडणूक आमदार मुरकुटे यांना स्वतंत्र हाताळावी लागणार आहे. त्यामुळे गडाख-घुलेंच्या यंत्रणेपुढे मुरकुटे यांच्या यंत्रणेचा निभाव लागणार ? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचा ज्ञानेश्‍वर सहकारी साखर कारखाना नेवासे तालुक्‍यातील भेंडा येथे आहे. तसेच नेवासे-शेवगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व देखील अनेक दिवस केल्याने तालुक्‍यात त्यांचे कार्यकर्ते आजही आहेत. घुले बंधूंची ताकद ज्या उमेदवारामागे उभी राहील, त्या गटाचा विजयाचा मार्ग सुकर असल्याचे बोलले जात असून, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत घुले यांनी गडाख यांच्या विरोधात भूमिका घेतल्याने मुरकुटे यांचा विजय सुकर झाला होता.

त्यामुळे पाच वर्षांच्या कार्यकाळात गडाख-घुले वाद हा जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत माजी आमदार शंकरराव गडाख यांनी घुले यांच्यावर हल्लाबोल करत ज्ञानेश्‍वर कारखान्याच्या ऊस भावा संदर्भात कारखाना स्थळी येऊन विचारपूस केली होती. त्यामुळे गडाख-घुले वाद चांगलाच चिघळला होता. हा वाद पुन्हा एकदा 2019 च्या विधानसभा निवडणुकीत नक्कीच बघयला मिळणार, अशी चर्चा असताना निवडणूक रंगात येण्या अगोदरच तालुक्‍यात गडाख-घुले मनोमिलन झाले आहे.

तर कोणासाठी गडाखांचा विरोध पत्करायचा…
2014 च्या विधानसभा निवडणुकीत घुले बंधूंनी आ. बाळासाहेब मुरकुटे यांना मदत केल्याने गडाखांचा पराभव झाला होता. तेव्हापासून गडाखांनी माजी आ. चंद्रशेखर घुले यांना विरोध करणे सुरू केले होते.

हा वाद वाढत असल्याने 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून माजी आ. पांडुरंग अभंग व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी उमेदवारी करून घुले बंधूंची राजकीय किंमत वाढावी अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. मात्र लंघे व अभंग यांनी सपशेल माघार घेतल्याने घुले यांचा पुरता हिरमोड झाला. नेवाशात निवडणूक करायची नाही.

जो विरोध होता, तो लंघे व अभंग यांच्यासाठीच होता. तेच जर माघार घेत असतील, तर गडाख यांचा विरोध का घेऊ, अशी भूमिका घुले यांची असल्याचे कार्यकर्त्यांतून सांगण्यात येत आहे. 2014 ची कसर भरून काढून गडाख यांच्याशी मैत्रीचे संबंध करत नेवाशात काम करण्याचे ठरवले असल्याचे कार्यकर्ते बोलत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here