बीडमधील राष्ट्रवादी धनंजय मुंडेंनीच संपवली – पंकजा मुंडे

मुंबई – बीडमध्ये एक स्वतंत्र असे राजकारण चालत आलेले आहे. पूर्वीपासून भाजपच्या बाजूने आणि त्यांच्या विरोधातली काही मते आहेत. धनंजय मुंडेंनी स्वतः काही कमावलेले नाही. पण जिल्ह्यातील राष्ट्रवादी त्यांनी यशस्वीपणे स्वतःच संपवली आहे, असा टोला महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी लगावला आहे.

समजा मी भाजपला कमी मतदान झालेल्या बूथची यादी मागवली तरी काय फरक पडणार आहे. धनंजय यांच्या बुद्धिमत्तेची जाणीव मला पूर्ण आहे, जगाला नाही. त्यांनी त्याचं प्रदर्शन करू नये, असेही त्या म्हणाल्या. विरोधकांनी जातीचं राजकारण केलं कारण त्यांच्याकडे दुसरा मुद्दाच नव्हता, अशी टीकाही त्यांनी केली.

पंकजा मुंडे म्हणाल्या, जयदत्त क्षीरसागर यांना राष्ट्रवादीने जेवढं छळले तेवढं आम्ही जवळ केले. विकासाच्या मुद्द्यावर एकत्र काम केले म्हणून आज ते आमच्या मित्रपक्षात शामिल होत आहेत, असे त्या म्हणाल्या. जिल्ह्यातले अनेक मोठे राष्ट्रवादीचे नेते पक्षापासून दुरावले. त्यामुळे आता पंकजा विरुद्ध धनंजय असा लढा नसून राष्ट्रवादीला अंतर्मुख करणारा हा लढा आहे. धनंजय यांच्या नेतृत्वात त्यांनी जिल्ह्यात पक्ष संपवला. मी स्वतः अनेक मोठ्या नेत्यांच्या संपर्कात आहे. भविष्यात त्यांचा प्रवेश झाला तर स्वागतच. मात्र अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, असेही पंकजा म्हणाल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.