जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस घायाळ

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा राजीनामा  
मुंबईत आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

सातारा – वाई विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी काल सोमवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर आज मंगळवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसला घायाळ करीत सातारा मतदारसंघातील पक्षाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आमदारकीचा राजीनामा देत भाजपमधील प्रवेशावर शिक्कामोर्तब केले.

मुंबईत उद्या बुधवारी होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत शिवेंद्रराजे भाजपमध्ये प्रवेश करतील. शिवेंद्रसिंहराजेंच्या निर्णयामुळे सातारा, कोरेगाव व कराड उत्तर या तीन विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस अडचणीत आली असून जिल्हा परिषद, जिल्हा बॅंक, नगरपालिका या संस्थांमधील राजकीय चित्रावरही मोठा परिणाम होण्याची शक्‍यता आहे.

साताऱ्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्याला मंगळवारी मोठे भगदाड पडले. सातारा- जावळी मतदारसंघातून पंधरा वर्षे राष्ट्रवादीचे आमदार असणाऱ्या शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना सोपवला. शिवेंद्रसिंहराजे यांचा बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गरवारे भवन सदनामध्ये जाहीर प्रवेश होणार आहे. सातारा, कराड उत्तर व कोरेगाव मतदारसंघात राजकीय दबदबा असणाऱ्या बाबाराजेंच्या जाण्याने राष्ट्रवादीच्या जिल्हयातील सत्तास्थानांना मोठा दणका बसला आहे. सातारा जावळी विधानसभा मतदारसंघात कमळ जोमाने फुलण्यास सुरवात झाली असून शिवेंद्रराजे यांच्या रूपाने भाजपला क्‍लास आणि मासचा नेता मिळाला आहे.

आमदारकीची हॅटट्रिक करणाऱ्या बाबाराजेंची साताऱ्यात अंर्तगत विरोधामुळे घुसमट वाढली होती. त्यामुळे कार्यकर्त्याचा कानोसा घेणारे राजकीय खल सुरूचिवर गेल्या दोन दिवसांपासून सुरू होते. शिवेंद्रसिंहराजेंनी कार्यकर्त्यांच्या शब्दांचा मान राखत मंगळवारी सकाळीच मुंबई गाठली व विधानसभा अध्यक्षांना राजीनामा पत्र सोपवत तातडीच्या पुढील बैठकीसाठी सातारा गाठले. भाजप प्रवेशाचे राजकीय शक्तीप्रदर्शन जोरदार होण्यासाठी

सातारा व जावळी तालुक्‍यातील प्रमुख शिलेदारांची सुरूचीवर पुन्हा सायंकाळी पाच वाजता कमराबंद बैठक बसली आणि राजकीय चर्चा रंगतच गेल्या. बाबाराजेंच्या निमित्ताने भाजपने राष्ट्रवादीला खिंडार पाडल्याने राजकीय समीकरणांची मोठी उलथापालथ होणार आहे. राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले सख्खे चुलतभाऊ आणि सातारा तालुक्‍याच्या राजकारणातील परस्परविरोधी ध्रुव . उदयनराजे बिनधास्त आणि बेधडक मात्र शिवेंद्रसिंहराजे संयमी व धोरणी वाटचाल ठेवणारे. दहा वर्षाच्या मनोमिलनानंतर सातारा पालिका निवडणुकांमध्ये वादाची ठिणगी पडली. राजा विरूद्ध प्रजा असा राजकीय रंग मिळालेल्या या लढतीत उदयनराजे यांनी आपल्या करिष्म्यावर माधवी कदम यांना नगराध्यक्ष म्हणून निवडून आणले. या लढतीत आमदार पत्नी वेदांतिकाराजे भोसले यांचा पराभव झाला. दोन्ही भावांच्या मतभेदांची दरी याच कारणाने प्रचंड रुंदावली.

आनेवाडी टोलनाक्‍याच्या निमित्ताने सुरूचीच्या दरवाजात झालेला राडा, जुना मोटार स्टॅंन्ड परिसरातील दारूचे दुकान हटवण्यासाठी दोन्ही राजांमध्ये उडालेली चकमक हा टोकाचा आंतरविरोध साताऱ्याने पाहिला. शरद पवारांच्या मध्यस्थीने दोन्ही भावांचे वाद मिटवण्याचे प्रयत्न झाले मात्र दोन ध्रुवांवर दोघ आपणं, अशी परिस्थिती राहिल्याने लोकसभा निवडणुकीत इच्छा नसतानाही पक्षादेश मानून शिवेंद्रराजेंनी खासदार उदयनराजे भोसले यांचे काम केले. मात्र शिवेंद्रराजेंच्या आघाडीचे शिलेदार प्रचारात कुठेच दिसले नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये उदयनराजे पूर्ण ताकदीने काम करतील याची शाश्‍वती शिवेंद्रसिंहराजेंना उरली नव्हती.

पुणे व मुंबई येथे झालेल्या बैठकीमध्ये शिवेंद्रराजे यांनी आपली होणारी घुसमट शरद पवारांच्या कानावर घातली होती. मात्र, पवारांचे वेळोवेळी उदयनराजे यांना मिळणारे अभय, बाबाराजेंच्या सर्वंकष नेतृत्वाला राष्ट्रवादीने न्याय न देणं, कार्यकर्त्याचा भाजपमध्ये जाण्यासाठी वाढलेला दबाव, विकास कामाच्या पूर्ततेवर विरोधी पक्षात असल्यामुळे पडणाऱ्या मर्यादा या सर्व कारणांचा विचार करून शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी सातारा व जावळी तालुक्‍यातील समर्थकांशी त्यांनी चर्चा केली.

शरद पवार यांनीही शिवेंद्रराजेंची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. या राजकीय घडामोडी गेल्या तीन चार दिवसांपासून सुरू होत्या. मंगळवारी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे राजीनामा सादर केल्यानंतर शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. बुधवारी सकाळी अकरा वाजता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गरवारे भवन सदनातील कार्यक्रमात शिवेंद्रराजे जाहीररित्या भाजपप्रवेश करणार आहेत.

हद्दवाढीसह रखडलेल्या प्रकल्पांना मिळेल गती
सातारा शहराची हद्दवाढ रोखणे हीच मुख्यमंत्र्यांची ग्यानबाची मेख होती. साताऱ्यात राष्ट्रवादीचा मोठा राजमान्य चेहरा गळाला लावणे हा हेतू होता. आता शिवेंद्रराजेंच्या भाजपमध्ये येण्याने साताऱ्यात अडकून पडलेल्या प्रकल्पांना नवीन गती मिळणार असून साताऱ्याची बरीच वर्ष लोंबकळलेली हद्दवाढ दृष्टीक्षेपात येणार आहे. त्यानंतर लोकसंख्येच्या निकषावर जे बारा नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. त्यामध्ये उदयनराजेला गटाला धक्का देत सातारा पालिकेत परिवर्तन घडवायचे हे भाजपचे पुढील मनसुबे असणार आहेत. शिवेंद्रराजेंच्या भाजपप्रवेशाने मूळचे भाजपचे सहा आणि नगरविकास आघाडीचे बारा असे अठरा संख्याबळ वाढणार असून सत्ताधाऱ्यांना आता टोकाचा विरोध होणार आहे. पालिका सभेत मंजूर एक्‍सप्रेस पळवणाऱ्यांना कायदेशीर व धोरणी विरोध होणार हे नक्की आहे. भुयारी गटार योजना, कास धरण उंचीच्या प्रकल्पांना अनुदान कपातीचा बसलेला फास सैल होणार असून बोंडारवाडी धरणाचे भाग्य उजळणार आहे. थोडक्‍यात साताऱ्याच्या राजघराण्याचा आंतरविरोध हा पक्षीय पातळीवर पोहचला आहे.

सातारा, जावली पंचायत समितीतही बाबाराजेच
सातारा व जावली मतदारसंघाची बाबाराजेंनी कधीच नाळ तुटू दिली नाही. सातारा व जावळी पंचायत समितीच्या राजकारणातही बाबाराजे हाच शब्द अंतिम आहे. सातारा पंचायत समितीत अठरापैकी तेरा सदस्य बाबाराजे गटाचे असून सभापती मिलिंद कदम व उपसभापती जितेंद्र सावंत हेसुद्धा कट्टर शिवेंद्रराजे समर्थक आहेत. जावळी पंचायत समितीत जयश्री गिरी सभापती व दत्ता गावडे उपसभापती आहेत. विजय सुतार, कांता सुतार, सौरभ शिंदे, अविनाश शिर्के व जिल्हा परिषद उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे व पश्‍चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे अध्यक्ष दीपक पवार अशी आठ जणांची समिती आहे. पवार वगळता सर्व सदस्य हे राष्ट्रवादीचे असले तरी बाबराजेंचे समर्थक आहेत. मात्र शिवेंद्रराजेंच्या प्रवेशाने किती समर्थक त्यांच्या बाजूने उभे राहतात, याचे चित्र मुंबईत स्पष्ट होणार आहे.

बॅंकेच्या राजकारणातही सलोखा
जिल्हा बॅंकेतील सहकाराचे राजकारण पक्षविरहित वेगवेगळ्या गटनिहाय निवडीतून चालते. शिवेंद्रराजे चेअरमन असून यानिमित्ताने बॅंकेच्या राजकारणात भाजपने मोठी मजल साधल्याचे चित्र आहे. बॅंकेतील चोवीसपैकी आठ सदस्य शिवेंद्रराजे यांचे नेतृत्व मानणारे असून दत्ता ढमाळ, प्रकाश बडेकर, कांचन साळुंखे, वसंतराव मानकुमरे ही त्यातील प्रमुख नावे आहेत. शिवेंद्रसिंहराजे यांचे राजकीय सलोख्याचे संबंध हा मोठा प्लस पॉईंट असून नोटाबंदीच्या मोठ्या दणक्‍यानंतरही जिल्हा बॅंकेने दुष्काळग्रस्तांना दोन कोटीची मदत करत तिमाही सत्रात 88 लाखाचा निव्वळ नफा कमविला.

ग्रामपंचायतीही प्रभावाखाली
शिवेंद्रसिंहराजेंच्या पक्षांतराने कोरेगाव, सातारा व कराड उत्तर या तीन तालुक्‍यांमध्ये राष्ट्रवादीच्या अडचणी वाढल्या आहेत. सातारा पालिकेत बारा सदस्य, जिल्हा परिषदेत बावीस, जिल्हा बॅंकेत नऊ संचालक बाबाराजे समर्थक आहेत. तसेच सातारा व जावळी पंचायत समितीच्या सत्ताही आमदार गटाकडे असून मतदारसंघ पुनर्रचनेतील खेड ग्रामपंचायत, विलासपूर, संभाजीनगर ते थेट धनगरवाडी हा कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील तसेच नागठाणे ते काशीळ या कराड उत्तर मतदारसंघातील ग्रामपंचायती बाबाराजेंच्या प्रभावाखाली आहेत. त्याचासुद्धा मोठा फटका हा राष्ट्रवादीला बसणार असून पश्‍चिम महाराष्ट्रात हा शरद पवारांना बसलेला सगळ्यात मोठा धक्का मानला जात आहे .

वसंतराव मानकुमरे देणार उपाध्यक्षपदाचा राजीनामा
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनीसुद्धा शिवेंद्रराजे यांच्यावर निष्ठा ठेवत उपाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे सूतोवाच केले. जिल्हा परिषदेत बाबाराजे गटाचे प्रतिक कदम, प्रा. डॉ. शिवाजीराव चव्हाण, वनिता गोरे, मधु कांबळे असे चार तर भाजपचे सहा सदस्य आहे. आता भाजपची सदस्यसंख्या दहा झाली असून सभागृहात राष्ट्रवादी विरोधाचा सूर धारदार होणार आहे.

तीन मतदारसंघात प्रभाव
सातारा, कोरेगाव व कराड उत्तरच्या राजकारणात बाबाराजेंचा दबदबा असल्याने आता कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे व कराडमधून बाळासाहेब पाटील यांची मोठी अडचण होणार आहे. मतदारसंघ पुनर्रचनेत सातारा शहरालगतची व जिल्ह्यातील मोठी खेड ग्रामपंचायतीसह माहुली ते शिवथर ते नागेवाडी या पट्ट्यात तर नागठाणे ते काशीळ हा कराड उत्तरमधील मोठा मतदारसंघ हा शिवेंद्रराजेंच्या प्रभावाखाली येतो. त्यामुळे राष्ट्रवादीची कोरेगाव व कराड उत्तरमधील घड्याळाची टिकटिक थांबवण्याची जबाबदारी बाबाराजेंवर सोपवली जाण्याची शक्‍यता आहे.

भाजप देणार राष्ट्रवादीच्या सत्तास्थानांना धक्का
शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा पक्षप्रवेश घडवून भाजपने राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील सत्तास्थानांना जोरदार धक्का दिला आहे. सातारा व जावळी पंचायत समितीसह, जिल्हा बॅंक, सातारा नगरपालिकेच्या राजकारणात मोठी उलथापालथ यापुढे पाहायला मिळणार असून दोन्ही राजेंच्या भविष्यकालीन संघर्षाला आता पक्षीय स्वरूप आले आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीची ही मोठी पडझड मानली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)