रेडा – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची राज्यपातळीवर देशपातळीवर युती झाली आहे. त्यामुळे केवळ आघाडीचा धर्म पाळण्यासाठी बावडा-लाखेवाडी या जिल्हा परिषदेच्या रिक्त झालेल्या जागेवर इंदापूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस उमेदवार उभा करणार नाही. या ठिकाणी कॉंग्रेसच्या उमेदवाराला राष्ट्रवादी खंबीर साथ देईल, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली.
राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री रत्नप्रभादेवी पाटील यांचे निधन झाल्याने या गटाची जागा रिक्त झाली आहे. या गटावर कॉंग्रेसचे वर्चस्व असल्याने व तसेच पाटील यांच्या कुटुंबावर दुःखद प्रसंग निर्माण झाल्याने या गटात लागलेल्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार उभा करणार नाही. तसेच नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आघाडी धर्म पाळत खासदार सुप्रिया सुळे यांना मनापासून साथ दिली. त्यामुळे राष्ट्रवादी आघाडीचा धर्म पाळण्यासाठी या रिक्त जागेवर कॉंग्रेसला साथ देणार आहे. या गटात 40 हजारांपेक्षा अधिक मतदारसंख्या आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादी हे दोन्ही राजकीय पक्ष पोटनिवडणुकीत एकदिलाने एका उमेदवाराचे काम करणार आहेत, त्यामुळे आघाडीचा विजय नक्की आहे; परंतु अचानक झालेल्या दुखत प्रसंगामुळे इतर राजकीय पक्षांनी देखील या पोटनिवडणुकीत सहकार्य करावे, असे आवाहन गारटकर यांनी केले आहे.