पुणे – “मुळशीच्या लोकांना पदे दिली आहेत. आपापसात भांडायचे नाही. नाही तर एकेकाच्या कानाखालीच आवाज काढेन,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना सज्जड दम भरला. “अशा घटनांतून यातून तुमची बदनामी होत नाही. बदनामी आमची होते,’ असेही पवार म्हणाले. मुळशी तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन पदाधिकाऱ्यांमध्ये मागील आठवड्यात झालेल्या हाणामारीच्या घटनेवरून पवार यांनी खडसावले. भर कार्यक्रमात पवार यांचा हा रुद्रावतार पाहून वातावरण गंभीर झाले.
मार्केटयार्ड येथील निसर्ग मंगल कार्यालयात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. माले (ता.मुळशी) येथील लग्न सभारंभात जिल्ह्यात सहकार क्षेत्रातील अग्रगण्य असलेले बॅंकेचे पदाधिकारी आणि मुळशी पंचायत समितीचे माजी सभापती यांच्यामध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार दि.24 मे रोजी घडला होता. भर लग्न समारंभात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जबाबदार नेत्यांमध्ये झालेल्या या हाणामारीच्या घटनेची जिल्ह्यात सर्वत्र चांगलीच चर्चा रंगली होती. ही बाब पवार यांच्या कानावर गेली होती. ही बाब पक्षाच्या दृष्टीने चांगली नसल्याने पवार यांनी भर कार्यक्रमात या दोन्ही पदाधिकाऱ्यांचा कडक शब्दांत चांगलाच समाचार घेतला.
“एकदा पदाधिकारी झाल्यानंतर तुमच्याकडे बघण्याचा नागरिकांचा दृष्टीकोन बदलतो. तुम्ही राष्ट्रवादीचे पदाधिकारी असता. पण ही कोणती पद्धत आहे? हे मी नवीनच बघत आहे,’ असे सांगून पवार म्हणाले, “अशा घटनांचे चित्रिकरण करून आजकाल लगेचच मोबाइलवर क्लिप फिरतात. यामुळे आजपर्यंत केलेल्या कामाचा सत्यानाश होतो. अशा घटना पुन्हा घडता कामा नये. तुम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी म्हणून वावरता. त्यामुळे जबाबदारीने वागा. नाहीतर मोकळा करेन. त्या व्यक्तीचे पद काढून घेतले जाईल. जोपर्यंत ती व्यक्ती व्यवस्थित वागत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला पदापासून दूर करायलाही मागे पाहणार नाही. नंतर मी कोणाचेही ऐकणार नाही. आपल्या पक्षाची एक परंपरा आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांची परंपरा पुढे नेणारा हा पक्ष आहे. पक्षाची बदनामी होईल, असे वागता कामा नये, याची सर्वांची खबरदारी घ्यावी,’ असे पवार यांनी यावेळी सांगितले.
उपाध्यक्ष पदाचा राजीनामा घेईन
“लोकांची कामे करण्यासाठी मुळशी तालुक्यात पदे दिली आहेत. पक्षाचेच पदाधिकारी भांडातात, यातून तुमची बदनामी होत नाही. बदनामी आमची होते. पवार साहेबांची होते. हा कोणता फाजिलपणा चाललाय? उपाध्यक्षपदाचा राजीनामा घेईन. मग मी टोकाचा वागेन,’ अशा शब्दात पवार यांनी मुळशीतील या दोन्ही पदाधिकाऱ्यांना इशारा दिला.