पुणे | राष्ट्रवादी काॅग्रेसची निवडणूक तयारीत “आघाडी’

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – विधानसभेसाठी ऑक्टोबर – नोव्हेंबर कालावधीत निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे. यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने निवडणुकीच्या तयारीत आघाडी घेतली आहे. या पार्श्चभूमीवर पक्षाकडून विधानसभा मतदारसंघनिहाय अर्ज मागविण्यात आले आहेत.
यात पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांसाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार ४ सप्टेंबरपर्यंत हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. याबाबतची माहिती पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली. पक्षाच्या शिवाजीनगर येथील कार्यालयात हे अर्ज उपलब्ध आहेत.
दरम्यान, राज्यातील निवडणुका शिवसेना- राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅंग्रेस हे “महाविकास आघाडी’ म्हणून लढणार आहेत. यात आघाडीच्या जागा वाटपात राष्ट्रवादीला पुण्यात खडकवासला, हडसपर, वडगावशेरी मतदारसंघ मिळण्याची चर्चा आहे.
मात्र, पक्षाकडून आठही मतदारसंघांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. तर पक्षाकडून या पूर्वी शिवाजीनगर तसेच कॅन्टोन्मेंट मतदारसंघांचीही मागणी करण्यात आलेली आहे. इच्छूक उमेदवारांना अर्जासोबत खुल्या प्रवर्गासाठी १० हजार रुपये, इतर प्रवर्गासाठी पाच हजार रुपये शुल्क भरावे लागणार आहे. हे शुल्क डिमांड ड्राफ्टद्वारे स्वीकारले जाणार आहे, असे जगताप यांनी सांगितले.





