चहासाठी राष्ट्रवादी अन्‌ जेवणासाठी रासप

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष निरीक्षकांबाबत जोरदार चर्चा 

दौंड – गेल्या पाच वर्षांत सत्तेच्या मांडवाखालून गेलेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना अजूनही मोह आणि स्नेह सुटत नसल्याचा प्रत्यय दौंड तालुक्‍यात आला आहे. दौंड तालुक्‍यात रासपचे कार्यकर्ते असलेल्या एका “बापूं’ना राष्ट्रवादीच्या तंबूत ओढले. त्यानंतर त्यांच्यावर राष्ट्रवादीने दौंड तालुक्‍याच्या निरीक्षकपदाची मोठी जबाबदारी दिली.

तालुक्‍यात त्यांची भ्रमंती सुरू असताना त्यांच्या आगमनाला चहापाणी राष्ट्रवादीकडून मिळत आहे. मात्र, पूर्वाश्रमीच्या या “बापूं’ना रासप कार्यकर्त्यांकडून जेवण मिळत असल्याची चर्चा दौंड तालुक्‍यात रंगली आहे, त्यामुळे राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते बुचकाळ्यात पडले आहेत.दौंड तालुका हा राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहे. त्यात माजी आमदार रमेश थोरात आणि आमदार राहुल कुल यांच्यातील उभा संघर्ष अवघ्या जिल्ह्याने पाहिला आहे.

2014 पासून दौंडचे पारडे रासपकडे झुकले. त्यात गेल्या विधानसभेला राहुल कुल यांना आमदारकीची लॉटरी लागली. त्यामुळे कार्यकर्त्यांचा गोतावळा कुलांच्या तंबूजवळ घिरट्या घालू लागला. त्यातून अनेक कार्यकर्ते उदयाला आले. या कार्यकर्त्यांमध्ये बापूराव सोनलकर हे राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते होते. गेल्या पाच वर्षांपासून रासप हा सत्तेतील वाटेकरी आहे. त्यातच आमदार राहुल कुल आणि मंत्री महादेव जानकर यांच्यामुळे त्यांची पाचही बोटे तुपात होती. त्यांची बडदास्त आणि कार्यकर्त्यांचा गोतावळा असल्यामुळे त्यांना राष्ट्रवादीने आपल्या पक्षात ओढले. काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीने दौंड तालुक्‍याच्या निरीक्षकपदाची जबाबदारीही बापूराव सोनवलकर यांना बहाल केली. “कामाचा बाप’ू म्हणून परिचित असलेल्या या रासप कार्यकर्त्याला निरीक्षकपदाची जबाबदारी देण्यामागे राष्ट्रवादीने बेरजेचे राजकारण केले.

या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाचा आमदार असल्याने त्या पक्षातून आलेल्या सोनलकरांना निरीक्षक म्हणून नेमणूक करून रासपवर शरसंधान साधण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने केला आहे. मात्र, बापू हे दिवसभर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या गराड्यात रमून जातात. दरम्यान, निरीक्षकपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर बापूराव सोलनकर यांनी दौंड तालुक्‍यात दौरे वाढवले आहेत. हे दौरे वाढत असताना त्यांनी पक्ष संघटनेतील विविध सेल, विविध कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत. मात्र, या बैठका घेतल्यानंतर त्यांच्याबरोबर चहापान होतो. मात्र, जुन्या सवंगड्यांचा दुरावा सोसवत नसल्यामुळे ते आपल्या रासपच्या गोतावळ्यात जेवणासाठी जात असल्याची चर्चा झडत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.