पुणे – राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या फुटीनंतर होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत पुण्यात दोन जागांवर राष्ट्रवादी विरोधात राष्ट्रवादी सामना रंगणार आहे. या जागांंमध्ये वडगावशेरी आणि हडपसर या मतदारसंघांचा समावेश आहे.
२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असताना या दोन्ही मतदारसंघांत राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी भाजपच्या उमेदवारांचा पराभव केला होता. मात्र, आता राष्ट्रवादीचा अजित पवार पक्ष महायुतीसोबत सत्तेत आहे.
तर, राष्ट्रवादीचा शरद पवार पक्ष महाविकास आघाडीत आहे. त्यामुळे जागा वाटपात या दोन्ही गटांनी या जागांची मागणी केली होती. त्यात त्यांच्या वाट्याला या जागा आल्याने या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. तर विशेष म्हणजे, या दोन्ही मतदारसंघात राष्ट्रवादीपेक्षा भाजपच्या नगरसेवकांची संख्या अधिक आहे.
वडगाशेरीत दुरंगी लढत
वडगावशेरी मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादीत दुरंगी लढत होणार आहे. या मतदारसंघातून राष्ट्रवादी काॅंग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाने माजी आमदार बापुसाहेब पठारे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी-अजित पवार यांच्या पक्षाकडून विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे.
मात्र, या मतदारसंघात २०१९ मध्ये पराभवाचा सामना करावा लागलेले माजी आमदार जगउरश मुळीक भाजपडून इच्छुक होते. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपला मिळावा अथवा त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत व्हावी, अशी चर्चा सुरू होती. मात्र, आपली उमेदवारी कायम ठेवण्यात टिंगरे यांना यश आले आहे.
तर, पठारे हे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून तिकीट न मिळाल्याने भाजपमध्ये गेले होते. त्यामुळे यावेळी राष्ट्रवादीचा उमेदवार महायुतीचा, तर, शरद पवार यांच्या पक्षाचा उमेदवार भाजपमधून आलेला आहे. त्यामुळे या मतदारसंघांत दोन्ही राष्ट्रवादीत सरळ सामना होणार आहे.
हडपसरमध्ये चुरस
महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपात हडपसर मतदारसंघ दोन्ही राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या वाट्याला गेला आहे. त्यामुळे येथेही चुरस निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी-अजित पवार पक्षाने येथून विद्यमान आमदार चेतन तुपे यांना पुन्हा संधी दिली आहे. तर, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्याच वेळी या मतदारसंघावर शिवसेनेच्या दोन्ही गटांनीही दावा केला होता. त्यात शिवसेना- शिंदे पक्षाचे शहरप्रमुख प्रमोदनाना भानगिरे इच्छुक होते.
मात्र, त्यांनी आता माघार घेतली आहे. मात्र, शिवसेना ठाकरे गटाकडून माजी आमदार महादेव बाबर अपक्ष म्हणून मैदानात उतरण्याची चिन्हे आहेत. लोकसभा निवडणुकीत बाबर यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांचा प्रचार केला होता. मात्र, आता बाबर यांना डावलण्यात आल्याने ते लढण्याच्या तयारीत आहेत. तर मनसेकडूनही शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांना उमेदवारी देण्यात आल्याने या मतदारसंघात चुरशीची लढत होणार आहे.