दखल: राष्ट्रवाद प्रवाहित व्हावा

अशोक सुतार

भाजपला बहुमत मिळाल्यापासून देशात अनेक उलटसुलट चर्चा सुरू आहेत. भाजप आता सत्तेत येणारा व जास्तीत जास्त बहुमत मिळवणारा मोठा पक्ष ठरला आहे. भाजप नेतृत्वाचा ठसा राजकीय पातळीवर उमटला आहे. त्यांचे नियोजन व व्यवस्थापन आणि संघटन योग्य होते. भाजपच्या राजकारणाची झेप फक्‍त बहुमत मिळवण्यासाठी नाही तर भवितव्यात दीर्घकाळ राजकीय वर्चस्व स्थापन करणे अशी असण्याची शक्‍यता आहे. भारतातील सार्वजनिक चर्चेची आणि संमतीची तसेच जनमताची चौकट काय असेल, हे आता भाजप ठरवेल. भाजपच्या वर्चस्वातून एकसुरी राजकारण न घडावे आणि विकासाला पोषक वातावरण निर्माण व्हावे, अशी जनतेची इच्छा दिसते.

देशात कधी नव्हे तो बेकारीचा उच्चांक गाठला गेला. तसेच देशात उद्योगधंदे जास्त प्रमाणात आलेले नाहीत किंवा शेतकऱ्यांचे सर्व प्रश्‍न सुटले आहेत, असे झाले नाही. त्याचबरोबर नोटबंदी आणि जीएसटीचे निर्णय वादग्रस्त ठरले ते मोदींच्या कार्यकाळात! परंतु जनतेने दुसऱ्यांदा मोदी सरकारला म्हणजेच भाजपला कौल दिला, हे गौडबंगाल विरोधकांना अजून तरी सुटले नाही. कारण मोदींनी गेल्या पाच वर्षांत ज्या पद्धतीने राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण करून देशाला जी गती दिल्याचे म्हटले जात आहे, ते दृष्टिपथात येत नाही. त्यात सर्व विरोधकांनी मतदानापूर्वी ईव्हीएम मशीनवर मतदान नको, अशी निवडणूक आयोगाला विनंती केली होती. पण त्याचे स्पष्ट कारण विरोधक सांगू शकले नाहीत. त्यामुळे ईव्हीएमवर मतदान झाले. त्यात भरीसभर म्हणून भाजपने गतवेळेपेक्षा जास्त जागा सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत पटकावल्या आहेत. भाजपला पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत मिळाले आहे. विरोधकांची दाणादाण उडवून मोदी व शहा जोडीने भाजपला सत्तेच्या मार्गावर आणून ठेवले आहे. सलग दुसऱ्यांदा निवडून येण्याची करामत भारतीय जनता पक्षाने साधली आहे. कोणत्याही बिगर-कॉंग्रेस पक्षाने ही करामत इतिहासात पहिल्यांदाच साधली आहे. भाजपच्या यशामुळे मोदी-शहा यांचे नेतृत्व अबाधित राहिले आहे.

मोदींचे पहिले सरकार राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे होते; परंतु भाजपकडे लोकसभेत पूर्ण बहुमत होते. यंदा त्याची पुनरावृत्ती झाली आहे. भाजप पुन्हा सत्तेत येत आहे, त्यामुळे त्यांची सर्व धोरणे योग्य होती, असेही नाही. परंतु विरोधकांची निष्क्रियता, आघाडीमधील मतभेद व निवडणुकीतील ढिसाळ नियोजन, जनता आपल्या पाठीशी आहे असे गृहीत धरण्याच्या वृत्तीमुळे विरोधकांना आलेला बेसावधपणा यांमुळे विरोधकांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. निवडणुकीत लोक कोणत्या मुद्द्यांवर मते देतील, हे आजपर्यंत कोणीही योग्यरीतीने मांडू शकलेले नाही. तसेच सरकारच्या कामगिरीचा आणि निवडून येण्याचा सुतराम संबंध नाही, असे सतराव्या लोकसभा निवडणुकीतील निकालाने स्पष्ट केले आहे. विरोधकांनी सरकारविरोधात गेल्या पाच वर्षांत अनेक आंदोलने केली, मोर्चे काढले. तसेच मोदी सरकारविरोधात जनमत संतप्त असल्याचे म्हटले जात होते. परंतु भाजप व मोदींना सतराव्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा निवडून येण्यासाठी जनतेनेच पाठिंबा दिला आहे. त्यामुळे जनमताचा आदर करत मोदी पुन्हा सत्तेवर येत आहेत. समाजातील सर्व घटकांनी भाजपला पाठिंबा दिला आणि त्यातून हा विजय साकारला आहे. गतवेळेच्या तुलनेत भाजपच्या मतांची टक्‍केवारी वाढली आहे.

देशाच्या पूर्व भागात भाजपने विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या वेळी आसाम, झारखंड आणि बिहार या राज्यांत भाजपने जे यश मिळवले होते, ते टिकवले. ओडिशा आणि पश्‍चिम बंगाल या राज्यांतही भाजपने कमळ फुलवले आहे. दक्षिणेतील काही राज्ये सोडली तर देशात सर्वत्र भाजपचा बोलबाला आहे. गतवर्षी कर्नाटकात भाजपने प्रवेश केला होता; आता तिथे सत्तावर्चस्व स्थापन करण्याचे संकेत दिले आहेत. भाजप सत्तेत येताच म्हणजे 2014 ते 2018 दरम्यान भाजपने एकामागून एक विजय प्राप्त केले. अनेक राज्यांमध्ये आपले स्थान बळकट केले. आता पुन्हा मोदींचेच सरकार सत्तेवर येईल, या सरकारवर मोदींचा पूर्ण प्रभाव असणार यात संशय नाही. मोदींमुळे भाजपला उच्च जाती, ओबीसी, शहरी मध्यमवर्गीय इत्यादीचा काही प्रमाणात पाठिंबा मिळवणे शक्‍य झाले. अन्यथा एक शहरी उच्चभ्रूंचा पक्ष तसेच विशिष्ट विचारांचा पक्ष अशी प्रतिमा पूर्वी होती. भाजपला सर्व स्तरावर घेऊन जाणे हे मोदींमुळे शक्‍य झाले. भवितव्यात पक्षाचा विस्तार होऊन विभिन्न समाजगट भाजपशी आता जोडले जाणे शक्‍य आहे. भाजप हा सलग दुसऱ्यांदा केंद्रात सत्तेवर येत आहे, त्यामुळे पक्षात पुन्हा व्यक्‍तिस्तोम माजणे, एकाधिकारशाही स्थापन होणे हे दोष निर्माण होऊ नयेत असे वाटते.

नेतृत्व, संघटन आणि वैचारिक दिशा अशा बाबतीत कॉंग्रेस पक्ष अपयशी ठरला असून कॉंग्रेसने याबाबत चिंतन करून सक्रिय होणे गरजेचे आहे. हे या निकालांनी स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कॉंग्रेसपुढे अनेक राज्यांत अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. विरोधी पक्ष म्हणून कॉंग्रेस दुसऱ्यांदा अपात्र ठरणार आहे. भवितव्यात आपण कोणते स्थान निभवायचे याचा पेच कॉंग्रेस पक्षापुढे उभा राहिला आहे. राज्यांतील प्रादेशिक पक्षांनी आपापल्या राज्यांपुरता विचार करून लोकसभा निवडणुकीनंतर कॉंग्रेसशी बोलू, असे धोरण स्वीकारले. छोट्या पक्षांनी आपला कुठे फायदा होतो, याची चाचपणी करत अस्तित्व जपण्याचा प्रयत्न केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान होतील, त्यांना कुणाचाही विरोध असण्याचे कारण नाही. मोदींच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा सत्तेत येणाऱ्या सरकारकडून जनतेच्या बऱ्याच अपेक्षा आहेत. स्पष्ट बहुमत पाठीशी असल्यामुळे लोकांच्या विकासाच्या अपेक्षा ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहतील. तसेच नवा भारत निर्माण करण्यासाठी त्यांचे आराखडे तयार असतील, ही अपेक्षा. प्रखर राष्ट्रवादाचा विचार राजकारण, समाजकारण व सांस्कृतिकतेमध्ये मोदी कसा प्रवाहित करणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.