पुणे – देशातील युवकांनी विविध सामाजिक प्रश्न जाणून घेऊन त्यांचा सखोल अभ्यास करावा, युवकांच्या वकृत्व कौशल्यात भर पडावा या उद्देशाने केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयातर्फे येत्या 13 जानेवारी रोजी संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात राष्ट्रीय युवा संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती पुणे नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी यशवंत मानखेडकर यांनी दिली.
या अभियानाच्या राज्य पातळीवरील स्पर्धेत 34 जिल्ह्यांतून जिल्हास्तरीय युवा संसदेतून प्रथम आणि द्वितीय क्रमांकाने विजयी ठरलेले असे एकूण 68 स्पर्धक सहभागी होणार आहेत. राज्यस्तरीय युवा संसदेत प्रथम आलेल्या स्पर्धकास संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात होणाऱ्या राष्ट्रीय युवा संसदेत प्रत्यक्ष बोलण्याची तर द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या स्पर्धकास राष्ट्रीय युवा संसदेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
राष्ट्रीय पातळीवर विजयी होणाऱ्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या स्पर्धकांना अनुक्रमे 2 लाख, दीड लाख आणि एक लाख अशी परितोषिके दिली जाणार आहेत.
महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे या राज्यस्तरीय युवा संसदेत ऑनलाइन पद्धतीने उपस्थित राहून राज्यातील युवकांचे वकृत्वगुण जाणून घेणार आहेत. नेहरू युवा केंद्र संघटनचे राज्य संचालक पी. पी. हिंगे आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे क्षेत्रीय संचालक डी. कार्तिकेयन यांच्या मार्गदर्शनाखाली या संसदेचे आयोजन करण्यात आले आहे.