नवी दिल्ली – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राणा दाम्पत्याचे उघडपणे समर्थन केले आहे. त्याचबरोबर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा दलित समाजातील असल्याने त्यांच्यावर अन्याय होत असल्याचा आरोप त्यांनी महाराष्ट्र सरकारवर केला.
राणा दाम्पत्यावर अन्याय केल्याचा महाराष्ट्र सरकारवर आरोप करून आठवले म्हणाले की, महाराष्ट्रातील अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्रीसमोर (23 एप्रिल रोजी) हनुमान चालीसाचे पठण करण्याची घोषणा केली होती. राणा दाम्पत्यावर महाराष्ट्र सरकारने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून 24 एप्रिल रोजी 14 दिवसांची तुरुंगात रवानगी केली होती.
नवनीत राणा यांच्यावर महाराष्ट्र सरकारने मोठा अन्याय केल्यामुळे मी त्यांना नेहमीच पाठिंबा दिला असल्याचे ते म्हणाले. आठवले पुढे म्हणाले की, नवनीत राणा त्यांच्याविरुद्धच्या देशद्रोहाचा खटला लढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जात आहेत. हनुमान चालिसा पठणाच्या नावावर देशद्रोहाचा गुन्हा थोपवायला नाही पाहिजे. महाराष्ट्र सरकारने त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप लावला आहे. हा मोठा गुन्हा आहे. नवनीत राणा व रवी राणा यांना न्याय मिळाला पाहिजे, असे रामदास आठवले म्हणाले.
दरम्यान, राणा दाम्पत्याने सोमवारी दिल्ली गाठून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि हनुमान चालीसा प्रकरणाच्या नावाखाली महाराष्ट्र सरकारकडून त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाची माहिती दिली आहे.