पुणे – महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेट संघटना(एमएसआरए) यांच्या तर्फे आयोजित व स्क्वॅश रॅकेटस् फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 76व्या वरिष्ठ राष्ट्रीय स्क्वॅश 2019 अजिंक्यपद स्पर्धेत 25राज्यांतील एकूण 474 खेळाडूंमध्ये जोश्ना चिनप्पा, महेश माणगावकर यांसारखे अव्वल मानांकित भारतीय खेळाडू झुंजणार आहेत. ही स्पर्धा दि.10 ते 16 जून 2019 या कालावधीत आयस्क्वॅश अकादमी, चंचला संदीप कोदरे स्पोर्टस् क्लब, मुंढवा, आरएसआय आणि अमनोरा मॉल ग्लास स्क्वॅश कोर्टवर होणार आहे.
याविषयी अधिक माहिती देताना महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेट संघटना(एमएसआरए)चे अध्यक्ष डॉ.प्रदीप खांड्रे आणि सचिव डॉ. ए. दयानंद कुमार यांनी सांगितले की, राजस्थान, चेन्नई, चंदीगढ, गुजरात, दिल्ली आणि महाराष्ट्र अशा 25 राज्यांतील खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला असून यामध्ये 115 महाराष्ट्रातील खेळाडूंचा समावेश आहे. स्पर्धेला पंचशील आणि जहांगीर हॉस्पिटल यांचे प्रायोजकत्व लाभले आहे. तसेच, या स्पर्धेला एसआरएफआय 7 स्टारची मान्यता मिळाली असून ही स्पर्धा स्क्वॅश रॅकेटस् फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेखाली होत आहे. स्पर्धेत एकुण 12लाख रूपयांची पारितोषिके देण्यात असून विजेत्या खेळाडूंना मानांकन गुण मिळणार आहेत.
ही स्पर्धा एकुण 9 वयोगटात होणार असून यामध्ये पुरुष व महिला गट, 35वर्षावरील, 40वर्षावरील, 45वर्षावरील, 50वर्षावरील, 55वर्षावरील, 60वर्षावरील, 65वर्षावरील पुरुष गट आणि प्रोफेशनल गट यांचा समावेश आहे. यातील पुरुष व महिला गटातील सामने अमनोरा मॉल येथे उभारण्यात आलेल्या ग्लास कोर्टवर होणार असून इतर गटातील सामने आयस्क्वॅश अकादमी येथे होणार आहेत.