पॅरिस – इस्रायलने बनवलेल्या पेगॅसस या हेरगिरीच्या सॉफ्टवेअरचा फ्रान्समध्ये वापर होत असल्याच्या शक्यतेने फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी गुरूवारी राष्ट्रीय सुरक्षेबाबतची बैठक बोलावली आहे. फ्रान्समध्ये या सॉफ्टवेअरचा वापर झाला असल्याचे वृत्त गेल्या आठवड्यात समोर आले होते.
पेगॅससचा फ्रान्समध्ये वापर होत असल्याच्या शक्यतेची मॅक्रॉ यांनी गंभीर दखल घेतली आहे. म्हणूनच ही तातडीची बैठक बोलावण्यात आल्याचे सरकारी प्रवक्त्याने सांगितले. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांच्याबाबत हेरगिरी करण्यासाठी पेगॅससचा वापर केला गेलेला नाही, असे इस्रायलची सायबर सिक्युरीटी कंपनी एनएसओओ ग्रुपने म्हटले आहे.
पेगॅसस सॉफ्टवेअरने ज्या राष्ट्राध्यक्षांना आणि प्रभावशाली व्यक्तींना लक्ष्य केले गेले असावे, अशांची एक यादी अलिकडेच “रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स’ या पत्रकारांच्या संघटनेने प्रसिद्ध केली. त्यामध्ये मॅक्रॉ यांचेही नाव समोर आल्यामुळे ही धावपळ सुरू झाली आहे. इस्रायलने या वादग्रस्त सॉफ्टवेअरची निर्यात करणे थांबवावे असे या संघटनेने म्हटले होते.
मर्केल यांचीही निर्बंध कडक करण्याची मागणी
पेगॅसस सॉफ्टवेअरचा वाढता वापर लक्षात घेऊन जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनीही या सॉफ्टवेअरवर कठोर निर्बंध घालण्याचे सूतोवाच केले आहेत. हे सॉफ्टवेअर चुकीच्या व्यक्तीच्या हातात पडायला नको यासाठी हे निर्बंध आवश्यक होते असे मर्केल यांनी म्हटले आहे. ज्या देशांमध्ये हेरगिरी विरोधातील कायदे फार कठोर नाहीत, तेथे वापर रोखण्यासाठी या सॉफ्टवेअरच्या खरेदीविरोधात उपाय योजना केली जाणे गरजेचे आहे, असे मर्केल म्हणाल्या.