सब-ज्युनियर राष्ट्रीय रोइंग स्पर्धेत 600 खेळाडूंचा सहभाग

पुणे – भारतीय रोइंग फेडरेशनच्या मान्यतेने आणि महाराष्ट्र रोइंग असोसिएशनच्या वतीने 22 व्या सब-ज्युनियर आणि चौथ्या आंतर राज्य चॅलेंजर्स स्प्रिंट राष्ट्रीय रोइंग चॅम्पियनशिपचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे. कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनीअरिंगच्या कॅम्पसमध्ये स्थित आर्मी रोइंग नोडमध्ये स्पर्धेला प्रारंभ झाला.

स्पर्धेचे उद्घाटन रोईंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्ष राजलक्ष्मी सिंग देव, सचिव गिरीश फडणवीस, महाराष्ट्र रोईंग फेडरेशनचे अध्यक्ष मुज्तबा लोखंडवाला, आर्मी रोईंग नोडचे सीईओ कर्नल सुब्रमण्यम, असोसिएशनच्या सचिव मृदुला कुलकर्णी, सहसचिव संजय वळवी, आंतरराष्ट्रीय पंच आणि ज्युरी नरेंद्र कोठारी यांच्या उपस्थितीत झाले.

सब ज्युनियर गटातील स्पर्धा 15 वर्षांखालील मुले आणि मुलींमध्ये होणार आहे. या स्पर्धेत 22 राज्यातून 600 हून अधिक रोव्हर्स सहभागी झाले आहेत. महाराष्ट्रातून सर्वाधिक 50 खेळाडू सहभागी झाले आहेत.

ही स्पर्धा सिंगल स्कल्स, डबल स्कल्स, कॉक्‍सलेस पेअर -2, कॉक्‍सलेस पेअर -4 आदी प्रकारांत होणार आहे. 11 जून रोजी (मंगळवार) स्पर्धेच्या अंतिम शर्यती आणि पारितोषिक वितरण समारंभ असेल. यावेळी पिंपरी चिंचवडचे महापौर राहुल जाधव उपस्थित राहणार आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.