पुणे महानगरपालिकेतर्फे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम-२०२० दि. १९ जानेवारी २०२० पासुन राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत ० ते ५ वर्ष वयोगटातील सर्व लाभार्थ्यांना पोलिओ डोस देणे बंधनकारक आहे. या वर्षी सदर मोहिम एकाच सत्रात राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेच्या नियोजना संदर्भात महापालिकेत नुकतीच बैठक पार पडली. बैठकीला डॉ. रामचंद्र हंकारे आरोग्य अधिकारी, पुणे महानगरपालिका, डॉ. वैशाली जाधव सहाय्यक आरोग्य अधिकारी (राष्ट्रीय कार्यक्रम) पुणे महानगरपालिका, डॉ. अमित शहा, लसीकरण अधिकारी पुणे महानगरपालिका, डॉ. सुर्यकांत देवकर, नोडल अधिकारी (NUHM विभाग) पुणे महानगरपालिका, बाल विकास प्रकल्प अधिकारी व अंगणवाडी पर्यवेक्षक आदी उपस्थित होते.
पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात सर्व प्रभागनिहाय एकूण १४०० पोलिओ बूथ आयोजित करण्यात आले आहेत. या मोहिमेमध्ये ० ते ५ वर्ष वयोगटातील अपेक्षित ३,००,००० लाभार्थीना पोलिओ डोस देण्याचे उद्दिष्ट आहे. सर्व प्रभागनिहाय पाच दिवस आय.पी.पी.आय. कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच रेल्वेस्थानक, बस स्थानक, उदयाने, महामार्ग इत्यादी ठिकाणी विशेष बुथ कार्यरत राहणार आहे.
सदर मोहिमेसाठी ३९६० स्वयंसेवक, २८० पर्यवेक्षक, १५ मुख्य पर्यवेक्षक, तसेच पुणे महानगरपालिकेचे १०० डॉक्टर्स, ५ विभागीय अधिकारी, पुणे महानगरपालिकेच्या नर्सेस व इतर कर्मचारी व्यतिरिक्त खाजगी डॉक्टर्स, अंगणवाडी सेविका, रोटरीयन्स, नर्सेस कॉलेजचे विदयार्थी यांचा सहभाग घेण्यात येणार आहे. तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी व्यतिरीक्त महिला बालविकास प्रकल्पातंर्गत अंगणवाडी सेविका, मदतनीस, स्वयंसेवक, आशावकर यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे.