National Herald case – नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र म्हणजे काॅंग्रेसच्या भ्रष्टाचाराचे आदर्श माॅडेल असून या वृत्तपत्राने त्यांच्यावर असलेले ९० कोटी रुपयांचे कर्ज माफ करून काँग्रेसने २००० कोटी रुपयांची मालमत्ता फक्त ५० लाख रुपयांना यंग इंडियन कंपनीला हस्तांतरित केली होती.
कोणताही राजकीय पक्ष अशा प्रकारे कर्ज देऊ शकतो का आणि जर कर्ज दिले गेले असेल तर त्यावर काही व्याज आकारले गेले होते का, असा प्रश्न भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते अनुराग ठाकूर यांनी विचारले आहेत.
ठाकूर म्हणाले की, नॅशनल हेराल्ड हे पूर्वी दैनिक वृत्तपत्र होते. ते आता नियमितपणे प्रकाशित होत नाही. तरीही, काँग्रेसशासित राज्यांमधील सरकारे त्याची जोरदार जाहिरात करत आहेत.
हिमाचल प्रदेशमध्ये मोठ्या दैनिकांना कमी प्रमाणात पैसे मिळतात तर नॅशनल हेराल्डला चांदीची नाणी दिली जातात. हे वृत्तपत्र काँग्रेसचे एटीएम बनले आहे का? अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) आरोपपत्रामध्ये या घोटाळ्याची तारीख, वेळ, ठिकाण आणि व्यवहाराशी संबंधित तथ्ये दिलेली आहेत.
काँग्रेसशासित राज्ये जनतेच्या कराच्या पैशाचा वापर करून जाहिरातींच्या स्वरूपात नॅशनल हेराल्डला निधी देत होते, असे सांगून ठाकूर म्हणाले की, दिल्ली, मुंबई, लखनौ आणि इतर शहरांमध्ये अनुदानित दरात वृत्तपत्राला देण्यात आलेल्या अब्जावधी रुपयांच्या मालमत्तांचा संदर्भात कुणी उत्तर देईल का? यंग इंडियाच्या या सर्व मालमत्तांचे भाडे योग्यरित्या आकारले जात आहे की ते बनावट आहे?
काँग्रेसने दिलेले वचन मोडले आहे. हिमाचल प्रदेशात काँग्रेसने महिलांना वचन दिलेले पैसे दिले नाहीत, कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याचा हप्ता दिला नाही, किंवा शेण किंवा दूध खरेदी करण्याचे आश्वासन पूर्ण केले नाही. तरीही, नॅशनल हेराल्डला मिळणाऱ्या जाहिरातीच्या निधीत कोणतीही कपात केलेली नाही.
यंग इंडियन कंपनीवर निशाणा साधत ठाकूर म्हणाले की, काँग्रेसच्या दोन माजी राष्ट्रीय अध्यक्षांचा त्यात ७६ टक्के हिस्सा आहे. ठाकूर यांनी विचारले की जर कर्ज माफ करायचे असेल तर नॅशनल हेराल्डची मूळ कंपनी असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडचे कर्ज का माफ केले नाही? १००० हून अधिक भागधारकांच्या हिताचे काय झाले?
काँग्रेसशासित राज्यांनी नॅशनल हेराल्डला किती आणि केव्हा जाहिराती दिल्या, हे जनतेला सांगावे. नियमित नसलेल्या वृत्तपत्रांना इतक्या जास्त जाहिराती देणे आणि दैनिक वृत्तपत्रांना कमी रक्कम देणे, हे काँग्रेसचे भ्रष्टाचाराचे मॉडेल ठरले आहे.’ असं देखील ते म्हणाले आहेत.