नवी दिल्ली – भाजप खासदार स्वैर आरोप करून नॅशनल हेरॉल्ड प्रकरणाच्या सुनावणीला विलंब करत आहेत, असा अरोप कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी केला आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी काही कागदपत्रे न्यायालयात सादर करण्यात यावीत,
तसेच काही साक्षीदारांनही पाचारण करण्यात यावे, अशी मागणी करणारा अर्ज स्वामी यांनी न्यायालयात सादर केला आहे. त्यांच्या या अर्जाला विरोध करताना राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी वरील आरोप केले आहेत. स्वामी यांचा अर्ज संबंधित तरतूदींखाली करण्यात आलेला नाही. म्हणून तो फेटाळण्यात यावा, अशी मागणीही गांधी यांच्याकडून करण्यात आली आहे.
स्वामी 2018 साली जेंव्हा या प्रकरणात साक्षीदार म्हणून आले होते, तेंव्हाच त्यांनी ही कागदपत्रे मागवून घ्यायला हवी होती. त्यामुळे स्वामी यांना संबंधित कागदपत्रे न्यायालयात मागवून घेण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही. न्यायालयाकडून फिरती चौकशी सुरू केली गेलेली नाही. त्यामुळे स्वामी यांचा अर्ज फेटाळण्यात यावा, अशी मागणीही गांधी यांच्याकडून करण्यात आली आहे.