पिंपरी – भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून देशभरात दि. 13 ते दि. 15 ऑगस्ट या कालावधीत घरोघरी तिरंगा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम राबवत असताना राज्यासह पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रध्वजाचा मोठा तुटवडा जाणवत आहे. गुजरातमधून आलेले तब्बल 40 हजार ध्वज हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याने परत पाठविण्यात आले आहेत.
राष्ट्रध्वज हे गुजरात, दिल्ली, मथुरा राज्यात मोठ्या प्रमाणात तयार केले जातात. मात्र, महापालिकेला ठेकेदाराच्या मार्फत गुजरातमधून आलेले राष्ट्रध्वज अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हे निकृष्ट दर्जाचे राष्ट्रध्वज नागरिकांना वितरित करणे महापालिकेने बंद केले आहेत.
भारतीय स्वातंत्र्याचे यंदाचे वर्ष हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. यानिमित्त देशभर आझादी का महोत्सव मोठ्या उत्साहात साजरे करण्याचे निर्देश केंद्र आणि राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहे. त्यामुळे पिंपरी महापालिकेच्या वतीने गेल्या महिन्याभरापासून या महोत्सवाची जोरदार तयारी, जनजागृती करण्यात येत आहे. शहरातील नागरिकांना एवढ्या मोठ्या प्रमाणात राष्ट्रध्वज उपलब्ध होणार नाही. म्हणून महापालिकेने निविदा प्रसिध्द करून राष्ट्रध्वजाची ठेकेदारामार्फत खरेदी केली आहे. महापालिकेने तीन लाख ध्वज खरेदी केले आहेत. यामधील आतापर्यंत पालिकेला 2 लाख 45 हजार ध्वज मिळाले आहेत. तर पुणे विभागीय कार्यालयामार्फत 1 लाख ध्वज महापालिकेला मिळाले आहेत.
देशात एकाच वेळी राष्ट्रध्वजाची मागणी वाढल्याने ध्वजाचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत ठेकेदारांनी राष्ट्रध्वज गुजरातमधील सुरत, दिल्ली, उत्तर प्रदेशातील मथुरा येथून आणले आहेत. मात्र, गुजरातमधून आलेले तब्बल 40 हजार ध्वज हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत. यामध्ये ध्वजाचा आकार वेग-वेगळा आहे, रंगामध्येही चुका आहेत. हे ध्वज महापालिकेने स्वीकारले नाहीत.
दरम्यान, महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये ध्वज विक्रीसाठी केंद्र उभारण्यात आले आहेत. आतापर्यंत या केंद्रातून आणि पालिकेच्या नेहरूनगर येथील गोडाऊनमधून दीड लाख ध्वजांची विक्री झाली असल्याची माहिती भांडार विभागाचे उपायुक्त मनोज
लोणकर यांनी दिली.
इच्छुक, माजी नगरसेवक प्रभागात वाटताहेत ध्वज
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच भागातील इच्छूक चांगलेच सक्रिय झाले आहेत. अमृत महोत्सवाचे औचित्य साधून इच्छुक आणि माजी नगरसेवक महापालिकेकडून ध्वज विकत घेऊन प्रभागातील नागरिकांना मोफत वाटत आहेत. यामध्ये माजी नगरसेवकांनी 300 ते 2 हजार ध्वज पालिकेकडून विकत घेतले आहे.