नवी दिल्ली – भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. बुधवारी लोकसभेमध्ये एसपीजी संशोधन विधेयकावर चर्चा करताना महात्मा गांधी यांचे हत्यारे नथूराम गोडसेला त्यांनी “देशभक्त’ संबोधले. यावरून टीकेची झोड उठल्याने आज प्रज्ञा सिंह ठाकूर यांना संरक्षण मंत्रालय समितीच्या सल्लागार पदावरून काढून टाकल्याची घोषणा भाजपाने केली आहे. तसेच त्यांचे विधानही लोकसभेच्या कार्यवाहीमधून काढण्यात आले आहे.
त्या वक्तव्याप्रकरणी भाजप प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर कारवाई करेल, असे भाजप प्रवक्ते जीव्हीएल नरसिंह राव यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले होते. यानुसार भाजपाने कारवाई करत प्रज्ञा सिंह ठाकूर यांना या समितीवरून हटविले असलायची माहिती भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा यांनी दिली.
प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी काल लोकसभेत केलेले वक्तव्य निंदनिय आहे. भाजपा कधीही अशा विचारांना थारा देणार नाही. अशा वक्तव्यांचे समर्थनही करणार नाही. आम्ही संरक्षण सल्लागार समितीवरून तिला काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या अधिवेशनात पक्षाच्या कोणत्याही बैठकीला तिला बोलविण्यात येणार नसल्याचे नड्डा यांनी सांगितले.
#WATCH BJP Working President JP Nadda: Pragya Thakur’s statement (referring to Nathuram Godse as ‘deshbhakt’) yesterday in the parliament is condemnable. She will be removed from the consultative committee of defence. pic.twitter.com/hHO9ocihdf
— ANI (@ANI) November 28, 2019
दरम्यान, सदनामध्ये जेव्हा डीएमके सदस्य ए राजा यांनी चर्चा करताना गोडसेचे उदाहरण दिले. तेव्हा प्रज्ञासिंग आपल्या जागेवर उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या की, देशभक्तांची उदाहरणं देऊ नका. यावर कॉंग्रेसच्या काही सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आणि कडाडून विरोध दर्शवला. त्यानंतर या दरम्यान संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी प्रज्ञासिंग यांना खाली बसण्यासाठी इशारा केला होता.