Farmers Long March : हजारो शेतकरी आणि मजुरांनी जमीन हक्क, सिंचन सुविधा आणि अखंडित वीजपुरवठ्यासह विविध मागण्यांसाठी रविवारी नाशिकहून मुंबईपर्यंत पायी मोर्चा काढला आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) आणि अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली, लाल झेंडे घेतलेल्या आंदोलकांनी सरकारने आपली आश्वासने पाळली नसल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास मुंबईतील मंत्रालयाला घेराव घालण्याचा इशारा त्यांनी दिला. या मोर्चामध्ये अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक ढवळे आणि सीआयटीयूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डी. एल. कराड यांचा सहभाग आहे. वन हक्क कायद्याची अंमलबजावणी, पेसा (पंचायत अनुसूचित क्षेत्रांपर्यंत विस्तार कायद्याच्या तरतुदी) अंतर्गत जमिनीचे हक्क, सिंचन योजनांची अंमलबजावणी, सोयाबीन आणि मक्याला किमान आधारभूत किंमत या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. Farmers Long March Nashik to Mumbai किसान सभेचे राष्ट्रीय सहसचिव अजित नवले म्हणाले, यापूर्वी पालघर जिल्ह्यात असाच लाँग मार्च काढण्यात आला होता आणि प्रशासनाने त्यांच्या अनेक मागण्या मान्य केल्यानंतर तो संपला होता. ठाणे आणि पालघरनंतर आता आम्ही नाशिकहून मुंबईपर्यंत (सुमारे २०० किमी) लाँग मार्च सुरू केला आहे. शेतकऱ्यांनी २०१५ आणि २०१९ मध्ये, जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, आणि २०२३ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळातही असेच आंदोलन केले होते. सरकार अशा आंदोलनांदरम्यान आश्वासने देते, पण ती पूर्ण करत नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. माजी आमदार जे. पी. गावित म्हणाले, आंदोलक शिधासामग्रीसह तयार आहेत आणि मुंबईला पोहोचण्याचा त्यांचा निर्धार आहे. आम्ही मंत्रालयाला घेराव घालू आणि आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत मागे हटणार नाही. वाटेत आणखी शेतकरी यात सामील होतील, असेही त्यांनी सांगितले. या मोर्चामुळे नाशिकच्या अनेक भागांतील वाहतूक बराच वेळ ठप्प झाली होती. हे ही वाचा : Farmer News : संतापजनक ! अनुदानाबाबत जाब विचारणाऱ्या शेतकऱ्याला बुटाने मारहाण Farmer loan relief: राज्य सरकारकडून कर्जमाफीची तयारी सुरू; मात्र ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ, काय आहेत नवे निकष?