पुणे – केंद्र सरकारच्या “उड्डान’ योजनेंतर्गत सुरू केलेली नाशिक-पुणे विमानसेवा मागील दोन वर्षांपासून बंद होती. मात्र, दिवाळीच्या मुहुर्तावर एअर इंडियाची कंपनी असलेल्या अलायन्स एअरद्वारे 27 ऑक्टोबरपासून ही विमानसेवा सेवा सुरू करण्यात आली आहे.
नाशिकच्या ओझर विमानतळाहून पुण्यासाठी सकाळी साडेदहा वाजता पहिल्या विमानाने उड्डाण घेतले. यावेळी विमानात 16 प्रवासी होते. तर, परतीच्या प्रवासावेळी 38 प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती, अलायन्स एअरच्या प्रशासनाने दिली.
केंद्र सरकारच्या रिजनल कनेक्टिव्हिटी “उड्डान’ योजनेंतर्गत ही सेवा सुरू करण्यात आली आहे. 70 आसनी या विमानाच्या तिकिटाचे दर साडेतीन हजार ते चार हजार रुपयांदरम्यान ठेवण्यात आले आहेत. दिवाळीनंतर तिकिटाचे दर कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या अगोदर डिसेंबर 2017 मध्ये नाशिक-पुणे ही विमानसेवा एअर डेक्कन कंपनीने सुरू केली होती. या सेवेला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता; परंतु काही कालावधीनंतर ही सेवा बंद करण्यात आली.
त्यानंतर, दोन वर्षांनंतर खंडित झालेली ही विमानसेवा सुरू करण्यासाठी अलायन्स एअरने हवाई वाहतूक मंत्रालयाकडे प्रस्ताव दाखल केला होता. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर ही सेवा आता सुरू केली आहे. नाशिक-पुणे विमानसेवेमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून कमी कालावधित या मार्गावर प्रवास करता येणार आहे.