नाशिक – नाशिक मधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दादोजी कोंडदेव नगर परिसरातील पोलीस चौकीतच पोलीसांनी ओली पार्टी रंगविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यादरम्यान मद्यपी पोलिसांकडून नागरिकाला मारहाण सुद्धा करण्यात आली आहे. या घटनेटे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
रघुनाथ ठाकूर, सागर बोधले, सुरेश जाधव, मयूर सिंग असे पार्टी करणाऱ्या संशयित पोलिसांची नावे आहेत. त्यांच्यावर गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील गंगापूर रोड आकाशवाणी टॉवर परिसरातील बाळासाहेब शिंदे हे उद्यानात बसलेल्या टवाळखोरांची तक्रार देण्यासाठी चौकीत गेले असता त्यांना चौकीतच पोलीस पार्टी करत असल्याचे दिसून आले. शिंदे यांना या पोलीसांनी आत बोलावून घेतले त्यानंतर लाईट बंद करून मारहाण केली, हा प्रकार जेव्हा परिसरात समजला तेव्हा रहिवाशांची मोठी गर्दी या ठिकाणी जमली. यावेळी एका मद्यपी पोलिसाने शिवीगाळ करत चौकीतून पळ काढला. नागरिकांनी दुचाकीने पाठलाग करत त्याला रोखले. त्याचे मोबाईल मध्ये चित्रीकरण केले असता नंतर तो पोलीस चौकीत आला.
पोलिसांच्या डर्टी पार्टीचे व्हिडीओ फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्याने. रात्री सव्वा दहाच्या सुमारास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस चौकीत भेट दिली. आणि नागरिकांना घडलेल्या प्रकरणाबाबत कारवाईचे आश्वासन दिले. त्यानंतर संतप्त नागरिक घरी परतले.