नाशिक – राज्यात भोंग्यांवरून राजकारण तापले असता नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी काल भोंग्यासाठी परवानगी न घेतल्यास 3 मे नंतर थेट कारवाई करणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आज पुन्हा आयुक्तांनी आणखी एक भोंग्यांवरून नवा आदेश दिला आहे. धार्मिक स्थळांवर लावलेल्या भोंग्यांचे डेसीबल मोजण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.
पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिलेल्या आदेशानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पोलीस अधिकाऱ्यांची संयुक्त टीम भोंग्यांचा आवाज मोजणार आहे. पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना डेसीबल मोजण्यासाठी विशेष ट्रेनिंग दिली जाणार असल्याचेही समजत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पोलीस अधिकारी एकत्रित धार्मिक स्थळांवरच्या भोंग्यांचे डेसीबील मोजणार आहेत. नादुरुस्त असलेल्या डेसीबल मोजण्याच्या मशीन तात्काळ दुरुस्त करून घेण्याचं आदेश पोलीस आयुक्तांनी प्रदूषण मंडळाला दिले आहेत.
काल दिलेल्या आदेशामध्ये अजानच्या आधी आणि नंतर 15 मिनिटांत परवानगी दिली जाणार नाही. इतकेच नाही तर मशिदीच्या 100 मीटरच्या आत हनुमान चालीसा लाऊडस्पीकरवर वाजवण्यास परवानगी नाही. कायदा व सुव्यवस्था राखणे हा या आदेशामागचा उद्देश असल्याचे नाशिक आयुक्तांनी सांगितले होते. सर्व धार्मिक स्थळांना 3 मे पर्यंत लाऊडस्पीकर वापरण्याची परवानगी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 3 मे नंतर आदेशाचे कोणी उल्लंघन करताना आढळून आल्यास, उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. असेही ते म्हणाले होते.