नाशिक – चांदवड तालुक्यातील कळमदरे गावचे भूमिपुत्र जवान अर्जुन तुकाराम गांगुर्डे यांचे गुरुवारी कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ओडिशा राज्यातील राऊर्केला येथील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात कार्यरत होते. जवानाच्या निधनाच्या दुर्दैवी निधनाची माहिती मिळताच चांदवड तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान अर्जुन यांचा मृतदेह आज शनिवारी (दि.11) सायंकाळपर्यंत चांदवडला पोहोचणार आहे. या वीर जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
अर्जुन गांगुर्डे यांचा चांदवड तालुक्यातील कळमदरे येथील शेतकरी कुटुंबात जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांना देशसेवेची आवड होती. इच्छाशक्तीच्या जोरावर ते 1991 मध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात भरती झाले. तेव्हापासून ते आजतागायत देशसेवेचे कर्तव्य बजावत होते. ओडीशा येथील राऊर्केला येथे आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. जवान अर्जुन गांगुर्डे यांच्या पश्चात आई वत्सलाबाई, वडील तुकाराम, पत्नी पुष्पा, मुलगा रोहन, मुलगी शिवानी असा परिवार आहे.