नाशिक : नाशिकमधील द्वारका उड्डाण पुलावर ट्रक आणि टेम्पोचा भीषण अपघात घडला. यामध्ये अपघातात ८ जणांचा मृत्यू, तर ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक – मुंबई महामार्गावर सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास लोखंडी सळ्याने भरलेल्या ट्रकला टेम्पोने मागून धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. हे सर्वजण निफाडमधून देवदर्शन घेऊन परतत असताना ही दुर्घटना घडली. या अपघातामध्ये जखमी झालेल्यांवर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुंबई नाका आणि भद्रकाली पोलीस या अपघाताची चौकशी करत आहेत. नाशिक जिल्हा रुग्णालयाचे सिव्हील सर्जन डॉक्टर चारुदत्त शिंदे यांनी सांगितले की, रुग्णालयामध्ये आले तेव्हाच 4 जणांचा मृत्यू झाला होता. तसेच, पाच जणांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यामधील दोघांची प्रकृती चिंताजनक असून सर्व जखमींवर आपत्कालीन वार्डमध्ये तात्काळ उपचार सुरू केले असल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, या अपघातानंतर नाशिक मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले होते. द्वारका उड्डाणपूलावर अपघात झाल्याने तेथील वाहतूक विस्कळीत झाली होती. नाशिकवरून मुंबईकडे जाणारी वाहतूक काहीकाळ बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे या महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.