Farmers Long March : माकप आणि अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली रविवारी (२५ जानेवारी) नाशिकहून सुरू झालेला हजारो शेतकऱ्यांचा भव्य लाँग मार्च लवकरच मुंबईत दाखल होणार आहे. आदिवासी व शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी नाशिक ते मुंबई असा हा (Long March)मोर्चा काढण्यात आला आहे. नाशिकच्या विल्होळी परिसरात मुक्काम केल्यानंतर सोमवारी सकाळपासून हा मोर्चा पुढे मार्गस्थ झाला. लाल टोप्या, हातात लाल झेंडे आणि अन्यायाविरोधातील घोषणांमुळे हा मोर्चा ‘लाल वादळ’ म्हणून ओळखला जात आहे. मंगळवारी या मोर्चामध्ये पालघर जिल्ह्यातील आमदार विनोद निकोले यांच्यासह किरण गहला, रडका कलंगडा, चंद्रकांत घोरखाना, तसेच ठाणे-पालघर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक नेते व कार्यकर्ते सहभागी झाले. या आंदोलनाची दखल राज्य सरकारने घेतली असून, नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत झालेली चर्चा निष्फळ ठरल्यानंतर आता आंदोलक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. Farmers Long March Mumbai 2026 मंगळवारी मुंबईतील मंत्रालयात चर्चेसाठी एका शिष्टमंडळाला आमंत्रित करण्यात आले असून, या शिष्टमंडळात डॉ. अशोक ढवळे, डॉ. अजित नवले, माजी आमदार जे. पी. गावित यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. फक्त आश्वासन नको दरम्यान, राज्य सरकारने हा मोर्चा नाशिकमध्येच थांबवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, “फक्त आश्वासन नको, तर ठोस शासन निर्णय आणि त्याची अंमलबजावणी हवी,” असे सांगत आंदोलनकर्त्यांनी माघार घेण्यास नकार दिला आहे. आंदोलकांच्या प्रमुख मागण्या आंदोलकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये वनहक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, वनजमीन व गायरान जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना स्वतंत्र सातबारा उतारे, पश्चिमेकडे वाहून जाणाऱ्या नद्यांचे पाणी दुष्काळग्रस्त व आदिवासी भागांकडे वळवणे, शिक्षणाचे खाजगीकरण थांबवणे आणि शेतीमालाला किमान आधारभूत किंमत देणे या मुद्द्यांचा समावेश आहे.