– राजेंद्र वाघमारे
नेवासा – नाशिक पदवीधर मतदार संघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील आणि अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी सोनई (ता.नेवासा) येथे रविवार (दि.२२) रोजी राज्याचे माजी मंञी शंकरराव गडाख यांच्या सुपूञाच्या विवाह सोहळ्याला हजेरी लावून प्रचार यंञणा सक्रिय ठेवली हे दोन प्रतिस्पर्धी उमेदवार समोरासमोर आले तरीही बघून न बघितल्या सारखे करुन प्रचार यंञणा विवाह सोहळ्याला भेट देवूनही सुरुच ठेवली माञ दोन्ही उमेदवारांनी एकमेकांस बोलणे टाळले असल्याने सत्तेसाठी कशी राजकिय कटूता येते ? याचाच प्रत्यय समोरासमोर आज दिसून आला.
जिल्ह्याचे जेष्ठनेते माजी खासदार साहित्यिक यशवंतराव गडाख – पाटील यांचे नातू व माजी मंञी शंकरराव गडाख – पाटील यांचे चिरंजीव उदयन व लोकनेते स्व.मारुतराव घुले पाटील यांची नात व माजी आमदार चंद्रशेखर घुले – पाटील यांची कन्या डॉ. निवेदिता यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात सोनई येथे पार पडला.
या विवाह सोहळ्याला राज्यातील अनेक दिग्गज राजकिय नेत्यांची उपस्थिती असतांना या विवाह सोहळ्यात नाशिक पदवीधर मतदार संघाच्या दोन एकमेकांचे प्रतिस्पर्धी उमेदवार तांबे व पाटील यांनी विवाह सोहळ्याला भेट देत उपस्थित मान्यवरांसह आलेल्या मान्यवरांच्या गाठीभेटी घेवून प्रचार यंञणा मोठी सक्रिय ठेवली असल्याचे दिसून आले.
दोन उमेदवार समोरासमोर येवूनही ऐकमेकांकडे साधे बघितलेही नाही त्यामुळे या दोन प्रतिस्पर्धी उमेदवारांनी ही निवडणूक कशी जिद्दीच्या वळणावर नेऊन ठेवली याचीच प्रचिती या विवाह सोहळ्यात दिसून आली.