नाशिक : मागच्या काही दिवसांपासून चिमुकल्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बदलापूर, परभणी, सांगली यानंतर आता नाशिकमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. यामध्ये आपटी बॉम्ब घेऊन देण्याच्या बहाण्याने आरोपीकडून 7 वर्षाच्या चिमुकलीचा विनयभंग करण्यात आला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
पीडित चिमुकली नवरात्रोत्सवानिमित्ताने दांडिया खेळत होती. स्थानिक रहिवासी असलेला संशयित महेश रघुनाथ वांद्रे (वय ४७) याने पीडितास आपटी बॉम्ब घेऊन देतो, असे आमिष दाखविले. तिला एका पडक्या इमारतीत घेऊन जात तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असं अश्लील वर्तन करत विनयभंग केला.
यानंतर पीडित मुलीने हा सगळा धक्कादायक प्रकार आपल्या कुटुंबीयास सांगितला. यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी आणि परिसरातील काही जणांनी आरोपीला बेदम चोप दिला. यानंतर याची माहिती भद्रकाली पोलिसांना देण्यात आली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि संशयितास ताब्यात घेतले.
यापूर्वीही काही दिवसांपूर्वी संशयिताने असाच प्रकार केल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. त्याच्याविरुद्ध बाललैंगिक अत्याचार विरोधी कायदा अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.