नाशिक – एका कार अपघातात जवानासह त्यांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहरात घडली आहे. बाजीराव त्र्यंबक मिस्कर (38), साई (12) (हनुमान नगर, मनमाड) अशी मृत बाप-लेकांची नावे आहेत. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
जवान बाजीराव त्र्यंबक मिस्कर हे भारतीय सैन्य दलात पंजाबमधील हिस्सार येथे कार्यरत होते. भावाच्या वर्षश्राध्दासाठी ते सुट्टीवर मनमाड येथे आले होते. जेजुरी येथे खंडोबाच्या देवदर्शनासाठी ते चालले होते. यावेळी सोमवारी पहाटे नगरजवळ अल्टोकार आणि ट्रकचा अपघात भीषण झाला. अपघात इतका भयंकर होता की त्यात कारचा चक्काचूर झाल्याने दोघा पिता-पुत्राचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने शहर परिसरात शोककळा पसरली आहे. गेल्या दहा दिवसांपूर्वी आपल्या भावाच्या वर्षश्राद्धासाठी सुट्टीवर घरी आले होते.
दरम्यान मनमिळावू असलेले बाजीराव आणि त्यांचे कुटुंब सर्वांना परिचित होते. ते सुट्टीवर आल्यानंतर सर्व नातेवाईक, मित्रमंडळींना भेटत होते. देव दर्शनासाठी जाताना त्यांच्यावर काळाने क्रूर घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.