Nashik Accident । नाशिकमधील द्वारका उड्डाण पुलावर ट्रक आणि टेम्पोचा भीषण अपघात घडला. यामध्ये अपघातात ८ जणांचा मृत्यू, तर ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नाशिक – मुंबई महामार्गावर सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास लोखंडी सळ्याने भरलेल्या ट्रकला टेम्पोने मागून धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. हे सर्वजण निफाडमधून देवदर्शन घेऊन परतत असताना हा भीषण अपघात झाला. मृत आणि जखमींमध्ये प्रामुख्याने किशोरवयीन मुलांचा समावेश आहे.
ट्रकमधील सळया मुलांच्या अंगात शिरल्या Nashik Accident ।
प्राप्त माहितीनुसार, लोखंडी सळ्यांनी भरलेला ट्रक धुळ्याहून मुंबईच्या दिशेने जात होता. त्यावेळी द्वारका उड्डाणपुलावर एक पिकअप टेम्पोने मागून ट्रकला जोरात धडकला. ही धडक इतकी जोरदार होती की, दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पिकअप ट्रकच्या मागच्या बाजूला पोरसवदा मुलांचा एक ग्रूप होता. अपघातानंतर लोखंडी ट्रकमधील सळया यापैकी काहीजणांच्या अंगात शिरल्या. या सगळ्यांच्या शरीरातून बराच रक्तस्राव झाला. त्यामुळे रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच चार जणांचा मृत्यू झाला. तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये अतुल मंडलिक, संतोष मंडलिक, दर्शन घरते, यश घरते, चेतन पवार यांचा समावेश आहे. तर राहुल राठोडे ( 20), लोकेश निकम (18), अरमान खान (15), ओम काळे, अक्षय गुंजाळ, राहुल साबळे हे सर्वजण गंभीररित्या जखमी असल्याची माहिती आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
या दुर्घटनेबद्दल माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. याठिकाणी पोलिसांकडून बराचवेळ वाहतूक पूर्ववत करण्याचे काम सुरु होते. परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, भद्रकाली पोलीस ठाण्यातील वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक दिनकर कदम व अन्य कर्मचाऱ्यांनी तातडीने मदतकार्य सुरु करुन जखमींना रुग्णालयात पाठवले.
मुलांचं शेवटचं स्टेटस व्हायरल Nashik Accident ।
नाशिकमधील या दुर्घटनेत मृत्यू झालेली मुलं ही सिडकोच्या सह्याद्रीनगर परिसरातील रहिवाशी होती. हे सर्वजण निफाड तालुक्यातील धारणगाव येथे देवाचे कारण या कार्यक्रमासाठी गेले होते. हा कार्यक्रम आटोपून महिलांचा टेम्पो आणि पुरुषांचा टेम्पो पुन्हा नाशिकच्या दिशेने परतत होते. महिलांचा टेम्पो सुरक्षितपणे सह्याद्रीनगर येथे पोहोचला. मात्र, पुरुषांच्या ट्रकचा द्वारका पुलावर अपघात झाला.
या अपघाताच्या काहीवेळापूर्वीच पिकअप टेम्पोमधील मुलांनी सोशल मीडियावर एक स्टेटस शेअर केले होते. यामध्ये टेम्पोच्या मागच्या बाजूला ही सर्व मुले गाण्यावर नाचत होती. काही मुले टेम्पोच्या वरच्या भागावर चढून बसली होती. सर्वजण आनंदात होते. मात्र, पुढील काही क्षणांमध्येच त्यांच्यावर काळाने घाला घातल्याने सह्याद्रीनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.