पुणे -रूपवेध प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा “तन्वीर सन्मान’ यंदा ज्येष्ठ अभिनेते नसीरूद्दीन शाह यांना जाहीर झाला आहे. तर “तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार’ महाराष्ट्र कल्चरल सेंटरला देण्यात येणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानच्या कार्यवाह दीपा लागू यांनी दिली. येत्या 9 डिसेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद निहलानी यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे.
पुरस्काराचे हे 15 वर्ष आहे. शाह हे गेली काही दशके नाट्य आणि चित्रपट क्षेत्रात कार्यरत आहेत. कालसुसंगत, नव्या जाणिवांची इंग्रजी, हिंदी व उर्दु भाषेतील नाटके ते सादर करतात. आजपर्यंत त्यांनी 42 नाटके सादर केली असल्याचेही दीपा लागू यांनी नमूद केले. शाह यांना पद्मश्री आणि पद्मभूषण या सन्मानांनी भारत सरकारने गौरविले आहे. महाराष्ट्र कल्चर सेंटरला यंदाचा तन्वीर नाट्यमर्धी पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
यापूर्वी अल्काझी, भालचंद्र पेंढारकर, तेंडुलकर, दुबे, गो. पु. देशपांडे, विजया मेहता यांच्यासह 13 रंगकर्मिंना तन्वीर पुरस्कार प्रदान केला आहे, असे लागू यांनी नमूद केले.