वॉशिंग्टन, – एखाद्या ग्रहाचे वातावरण नष्ट झाल्यानंतर तेथे निर्माण झालेल्या ज्वालामुखीमुळे पुन्हा त्या भोवती वातावरण निर्माण होत असल्याचे पुरावे शास्त्रज्ञांना मिळाले आहेत. जीजे 1132 या ग्रहाभोवती हायड्रोजनचा जाड थर निर्माण होत असल्याचे आढळले आहे.
पृथ्वीच्या कित्येक पट मोठा असलेल्या आणि सब नेपच्यून अशी ओळख असणाऱ्या या ग्रहाच्या भोवती असणारे प्रिमॉर्डिअल हायड्रोजन आणि हेलीयमच्या वातावरणाचा थर त्याच्या उष्ण उपग्रहाच्या किरणोत्सारामुळे नाहीसा झाला होता. त्यामुळे हा ग्रह पृथ्वीच्या आकाराचा दिसू लागला होता.
नासाच्या हबल अवकाश संशोधन दुर्बिणीतून केलेल्या पाहणीत अवकाश संशोधकांना या ग्रहाभोवती दुसऱ्यांदा वातावरण तयार झाल्याचे आढळून आले आहे. प्रत्यक्ष पाहणी आणि संगणकीय संशोधनातून हे वातातवरण मोलेक्युलर हायड्रोजन, हायड्रोजन सायनाईड, मिथेन आणि अरोसोल यांच्यातून बनल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे. याच्या छायाचित्रातील हा थर पृथ्वीच्या सभोवती असणाऱ्या धुरासारखा दिसत आहे. त्यामुळे त्यात हायड्रो कार्बन असावे असा अंदाज व्यक्त होत आहे.
जीजे 1132 ग्रहाच्या सध्याच्या वातावरणातील हाय्रोजन हा त्या ग्रहाच्या मुळ वातावरणातील वितळलेल्या आवरणातील असावा. तेथे झालेल्या ज्वालामुखी सारख्या प्रकाराने तो बाहेर पडत असावा. सध्याच्या वातावरणातील हायड्रोजनचे प्रमाण हे अवकाशातील या वायुने भरून काढले असावे. हे अत्यंत उत्साहजनक आहे. कारण वातावरणाचे पुननिर्माण होताना आम्ही पहात आहोत, ते दुसरे वातावरण आहे, असे या अभ्यासाचे सहलेखक रैसा इस्ट्रेला यांनी सांगितले.
या ग्रहाचे वातावरण गेल्यामुळे ओसाड दिसणारा हा ग्रह पाहणे त्रासदायक होते. मात्र सध्या त्याच्याकडे पाहताना अरेच्चा तेथे अद्याप वातावरण असल्याचे जाणवले, असेही रैसा यांनी सांगितले. दि ऍस्ट्रॉनॉमिकल जर्नलच्या अगामी अंकात हे संशोधन प्रकाशित होणार आहे.