नवी दिल्ली : मंगळवारी नासाला इस्रोच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा चांद्रयान-2 या मोहिमेतील विक्रम लॅंडरचा शोध घेण्यात यश आले आहे. चंद्रावरील विक्रम लॅंडरचे अवशेष आणि त्यामुळे उमटलेले परिणाम यांचे फोटो नासाकडून सोशल मीडियावर पोस्ट करत याविषयीची माहिती देण्यात आली. 7 सप्टेंबरला लॅंड होण्याआधी काही क्षणांपूर्वीच विक्रम लॅंडरचा इस्त्रोशी त्याचा संपर्क तुटला होता.
नासाने ‘चांद्रयान -2’च्या विक्रम लॅंडरच्या अवशेषांचे फोटो पोस्ट करत लिहिले, ‘आमच्या नासामून या मोहिमेदरम्यान चांद्रयान-2 चा विक्रम लॅंडर सापडला आहे.’ हे फोटो आणि मोहिमेविषयीची अत्यंत महत्त्वाची माहिती जाहिर करताच अनेकांनीच पुन्हा एकदा ‘चांद्रयान-2 ‘ मोहिमेविषयीची उत्सुकता व्यक्त केली.
The #Chandrayaan2 Vikram lander has been found by our @NASAMoon mission, the Lunar Reconnaissance Orbiter. See the first mosaic of the impact site https://t.co/GA3JspCNuh pic.twitter.com/jaW5a63sAf
— NASA (@NASA) December 2, 2019
दरम्यान, नासाकडून ट्विट करत देण्यात आलेल्या माहितीनुसार, फोटोमध्ये दर्शवण्यात आलेले हिरव्या रंगाचे टीपके हे स्पेसक्राफ्टचा मोडतोड झालेला भाग आहेत. (असू शकतो). शणमुगा सुब्रमणियनद्वारा मुख्य दुर्घटनास्थळाच्या उत्तर पश्चिमेला जवळपास 750 मीटरच्या अंतरावर असणाऱ्या अवशेषांना सर्वप्रथम मोजेक (1.3 मीटर पिक्सल, 84 डिग्री) मध्ये त्याची ओळख पटली. या अवशेषांमधील तीन तुकडे हे 2×2 पिक्सलचे आहेत, असं वैज्ञानिक संज्ञा मांडत सांगण्यात आलं आहे. अधिकृतपणे मिळालेल्या या माहितीनंतर अवशेषांचे पूर्वीची आणि सध्याची छायाचित्र यांच्यात तुलनाही करण्यात आली.
नासाने एक किलोमीटर अंतरावरुन विक्रम लॅंडरचे फोटो टिपले आहेत. यामध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लॅंडरच्या क्रॅश लॅंडिंगमुळे झालेला परिणाम दिसून येत आहे. विक्रमला चंद्रावर यशस्वी लॅंडिंग करता आलं नाही. विक्रमचं लॅंडिंग चुकल्यानं त्याचे चंद्राच्या पृष्ठभागावर झालेले परिणाम नासानं टिपलेल्या फोटोत स्पष्टपणे दिसत आहेत. इस्रोनं नासाशी संपर्क साधून विक्रम लॅंडरसंदर्भातील विस्तृत माहिती मागितली आहे. नासा विक्रम लॅंडरबद्दलचा एक अहवाल इस्रोला देणार आहे. यामधून विक्रमच्या क्रॅश लॅंडिंगबद्दलची अधिक माहिती मिळू शकेल.
विक्रम लॅंडरच्या संदर्भातील माहिती मिळण्याची शक्यता नासानं याआधीच व्यक्त केली होती. विक्रमचं क्रॅश लॅंडिंग झालेल्या भागावरुन लूनार रेकनेन्सेस ऑर्बिटर जाणार असल्यानं विक्रम लॅंडरशी संबंधित माहिती हाती लागू शकते, अशी शक्यता नासाकडून वर्तवण्यात आली होती. याआधी 7 सप्टेंबरला नासाचं ऑर्बिटर विक्रमच्या लॅंडिंग साईटवरुन गेलं होतं. मात्र त्यावेळी विक्रमशी संबंधित माहिती नासाला मिळाली नव्हती.