वॉशिंग्टन – नासा या अमेरिकन अंतरीक्ष संशोधन संस्थेच्या हंगामी प्रमुख म्हणून भव्या लाल या मूळ भारतीय वंशाच्या वैज्ञानिकाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना अभियांत्रिकी तसेच अंतरीक्ष तंत्रज्ञान क्षेत्राचा चांगला अभ्यास आहे.
भव्या लाल यांनी या आधी व्हाइट हाउसच्या विज्ञान-तंत्रज्ञान धोरण विभागात अंतरीक्ष तंत्रज्ञान, धोरण याच्या विश्लेषकाची भूमिका पार पाडली आहे. बायडेन प्रशासनाकडे अमेरिकेचे हस्तांतर होण्याच्या प्रक्रियेसाठी जी समिती नेमण्यात आली होती, त्या समितीच्या सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. त्यांनी अमेरिकेच्या पाच अत्यंत उच्चाधिकार अशा समित्यांवरही काम केले असून या समित्या विज्ञान, तंत्रज्ञान आणि संरक्षण विभागाशी संबंधीत होत्या.
नासाच्या अनेक तांत्रिक व प्रशासकीय समित्यांवरही त्यांनी काम पाहिले असून अमेरिकेच्या अवकाश संशोधन क्षेत्रातील कार्याचा त्यांना मोठा अनुभव आहे. अमेरिकेच्या अण्विक धोरणांचाहीं त्यांना चांगला अभ्यास असून त्या संबंधीत कमिट्यांवरही त्यांनी काम केले आहे. त्या इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ ऍस्ट्रानॉटिक्स या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या संस्थेच्याही सदस्य होत्या. त्यांनी अण्विक अभियांत्रिकी या विषयात पदवी आणि पदुव्यत्तर शिक्षण मॅस्युच्युसेट्स संस्थेतून घेतले आहे.