पिंपरी (प्रतिनिधी) – शहरात हळूहळू करोनाचा मोठा प्रसार होऊ लागला आहे. शहरातील अनेक परिसर “करोना’च्या विळख्यात अडकले आहेत. शहरातील आठ क्षेत्रीय कार्यालयांपैकी केवळ एका क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत परिसर “करोना’पासून अद्याप तरी दूर आहे. इतर सर्व प्रभागांमध्ये “करोना’चे रुग्ण आढळले आहेत. “करोना’ संशयितांची संख्या रोजच वाढत आहे. लवकर चाचण्यांचे अहवाल प्राप्त व्हावेत, यासाठी भोसरीतील राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेत (नारी) करोनाची तपासणी करण्यास परवानगी देण्यात आली. यामुळे “करोना’ चाचणीला गती मिळाली आहे.
“करोना’बाधितांच्या संपर्कातील नागरिकांची चाचणी अत्यावश्यक असते. ही संख्या 5 मे पासून सातत्याने वाढत आहे. रोज दीडशेहून अधिक रुग्ण महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये दाखल होत आहेत. त्यांचे “स्वॅब’ करोना चाचणीसाठी पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत. चाचणीचे प्रमाण वाढत असल्याने अहवाल प्राप्त होण्यास उशीर होत होता.
या संस्थेत जिल्ह्यासह विविध भागातून हे “स्वॅब’ तपासणीसाठी येत आहेत. त्यामुळे शहरातील रुग्णांच्या चाचणीचा अहवाल मिळण्यास विलंब होत आहे. ही बाब लक्षात घेता भोसरीतील राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेत (नारी) करोनाची तपासणी करण्यास परवानगी द्यावी, यासाठी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर प्रयत्नशिल होते. ही चाचणी करण्यास इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने परवानगी दिलेली आहे. याबाबत अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील म्हणाले, गेल्या आठवड्यापासून दररोज एकूण 100 ते 150 इतक्या करोना संशयित रुग्णांचे “स्वॅब’ महापालिकेकडून तपासणीसाठी भोसरीतील “नारी’ संस्था आणि पुण्यातील “एनआयव्ही’ संस्थेकडे पाठविले जात आहेत.
“नारी’ची क्षमता 150 चाचण्यांची
भोसरीतील राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेत (नारी) करोनाच्या रोज 150 नमुन्यांची तपासणी करण्याची क्षमता आहे. सध्या या संस्थेकडे दररोज 30 ते 50 संशयित रुग्णांचे “स्वॅब’ तपासणीसाठी येत आहेत. त्याचप्रमाणे करोना “टेस्ट किट’ची वैधता तपासणी करण्याची सोय देखील “नारी’मध्ये उपलब्ध आहे, अशी माहिती नारी संस्थेचे संचालक समिरन पांडा यांनी दिली.