मुंबई : सरकारमध्ये असूनही आमचे ऐकले जात नाही. त्यामुळेच आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार नरहरी झिरवळ यांनी म्हटले आहे. आदिवासी समाजात धनगर समाजाचा समावेश करण्याला विरोध करत झिरवळ यांनी मंत्रालयासमोर आंदोलन सुरू केले आहे. आम्हाला समाजाने सभागृहात पाठवले आहे. त्यामुळे आम्ही समाजासाठी भांडणार असल्याचे त्यांनी म्हणाले आहे. मात्र राजीनामा देणे हा पर्याय नाही. आम्हाला समाजाने समाजासाठी भांडण्याला सभागृहात पाठवला आहे. आम्ही देखील समाजासाठी भांडण करायला तयार असल्याचे झिरवळ यांनी म्हटले आहे.
धनगर समाजाला एसटी अर्थात अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण दिले तर सर्वच पक्षांतील आदिवासी आमदार आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देतील, असा इशारा देण्यात आला आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार नरहरी झिरवळ चांगलेच आक्रमक झाले आहेत. या प्रकरणी त्यांनी आजपासून मंत्रालयासमोर धरणे आंदोलन करण्यास सुरुवात केले आहे. या आंदोलनात त्यांच्यासोबत इतर आदिवासी आमदार देखील सहभागी झाले आहेत. आमदारांच्या या भूमिकेमुळे धनगर आरक्षणाचा प्रश्न अधिकच पेटण्याची शक्यता आहे.
सकल धनगर समाजाने एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी राज्यभर आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी एक समिती नेमण्याची घोषणा केली होती. तसेच धनगड व धनगर हा शब्द एकच असल्याचा जीआर काढण्याचीही तयारी दर्शवली होती. पण त्यांच्या या घोषणेला आदिवासी आमदारांनी कडाडून विरोध केला जात आहे. आमचा धनगर आरक्षणाला विरोध नाही. पण त्यांना एसटी प्रवर्गातून आरक्षण देऊ नका. त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या. त्यांना एसटीतून आरक्षण दिले, तर आम्हाला काहीच उरणार नाही. त्यानंतरही सरकारने त्यांना अनुसूचित जमातीचे (एसटी) आरक्षण देण्याचा प्रयत्न केला, तर सर्वच पक्षांतील 24 आदिवासी आमदार आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देतील, असा इशारा या आमदारांकडून देण्यात आला आहे.
धनगर व धनगड या दोन्ही जाती एकच नाही
नरहरी झिरवाळ यांनी धनगर व धनगड या दोन्ही जाती एकच असल्याचा दावाही फेटाळला आहे. धनगर व धनगड जात एकच आहेत. स्पेलिंग चुकल्यामुळे हा प्रकार घडल्याचा दावा केला जातो. पण त्यात कोणतेही तथ्य नाही. असे असते तर एवढी वर्षे ही गोष्ट कुणाच्याही लक्षात का आली नाही? विशेषतः यामुळे ही सूची तयार करणाऱ्याला इंग्लिश येत नसावी का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.