नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यास राहुल आणि सोनिया गांधी उपस्थिती लावणार

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर उद्या म्हणजेच ३० मे रोजी नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. दिल्लीतील राष्ट्रपती भवनामध्ये नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या दैदिप्यमान शपथविधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून देश-विदेशातील अनेक मातब्बर नेते मोदींच्या शपथविधीस उपस्थिती लावणार आहेत.

अशातच आता, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि त्यांच्या आई सोनिया गांधी हे देखील नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्यास उपस्थिती लावणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणुकांदरम्यानच्या प्रचारसभांमध्ये नरेंद्र मोदी आणि भाजपच्या इतर नेत्यांद्वारे सातत्याने काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांच्यावर तीव्र शब्दांमध्ये टीका करण्यात आली होती. काँग्रेस नेत्यांनी देखील मोदी आणि इतर भाजप नेत्यांच्या टीकेला प्रतिउत्तर दिले होते. मात्र निवडणूक प्रचार सभांमध्ये भाजपतर्फे काँग्रेसच्या दिवंगत नेत्यांवर देखील टीका करण्यात आल्याने राहुल गांधी व सोनिया गांधी मोदींच्या शपथविधी सोहळ्यास उपस्थिती लावतील काय असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आई सोनिया गांधी यांच्यासह उपस्थिती लावणार असल्याचे अधिकृतपणे जाहीर झाले असल्याने आता या प्रश्नावर पडदा पडल्याचे चित्र आहे.

तत्पूर्वी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यास उपस्थिती लावणार नसल्याचे स्पष्ट केले असून त्यांनी याबाबत ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. भाजपतर्फे उद्या राष्ट्रपती भवनामध्ये होणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याचे पश्चिम बंगालमधील राजकीय हिंसाचारात बळी गेल्याचा दावा करण्यात आलेल्या ५२ भाजप कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना विशेष निमंत्रण देण्यात आले असून ही बातमी ऐकल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी शपथविधी सोहळ्यास उपस्थिती लावण्याचा आपला निर्णय मागे घेत भाजपवर टीका देखील केली.

दरम्यान, भारताकडून यंदा बीआयएमएसटीइसी संघटनेतील देशांच्या नेत्यांना नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळयाचे निमंत्रण देण्यात आले आहे. बीआयएमएसटीइसी अर्थात BIMSTEC ही सात देशांची आंतरराष्ट्रीय संघटना असून यामध्ये बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, नेपाळ भूतान आणि भारत या देशांचा समावेश आहे. मात्र पाकिस्तान हा BIMSTEC संघटनेचा सदस्य नसल्याने इम्रान खान यांना या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आलेले नाही. गतवर्षी २०१४मध्ये मोदींच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्यास सार्क देशांच्या संघटनेस निमंत्रण देण्यात आल्याने पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांनी २०१४च्या शपथविधी सोहळ्यास उपस्थिती लावली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.