पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी रात्री पुण्यात राजभवन येथे मुक्कामी होते. या पार्श्वभूमी राजभवन परिसरासह शहरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उद्या (बुधवारी) सकाळी ते अकलूज येथील प्रचारसभेला जाणार आहेत.
भुवनेश्वर येथील सभा संपवून रात्री मोदी पुण्यात दाखल झाले. मंगळवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास पुणे विमानतळावर मोदी यांचे आगमन झाले. यावेळी पुणे लोकसभा मतदार संघातील भाजप-सेना युतीचे उमेदवार गिरीश बापट व अनिल शिरोळे, संजय काकडे यांच्यासह आमदारांनी त्यांचे स्वागत केले. पुण्यात त्यांचा राजभवन येथे मुक्काम झाला.
पुणे विमानतळ ते राजभवन व राजभवन ते पुणे विमानतळ असा त्यांचा प्रवास आहे. त्यामुळे पोलिसांनी सोमवारी रात्री सराव घेतला. तसेच, या मार्गावर बंदोबस्ताची आखणी केली. राजभवन येथे मुक्काम केल्यानंतर मोदी सकाळी आठच्या सुमारास राजभवन येथून पुणे विमानतळावर जाणार असून त्यानंतर ते हेलिकॉप्टरने अकलूजला प्रचाराला जाणार आहेत. अकलूज येथील सभा झाल्यानंतर ते हेलिकॉप्टरने पुणे विमानतळावर येणार असून नंतर ते विमानाने राजकोट येथे पुढील प्रचार सभेसाठी जाणार आहेत.