मोदींच्या हातात अण्वस्त्रे सुरक्षित आहेत का?

पाकिस्तानी पंतप्रधानांचा नवा कांगावा

इस्लामाबाद  – भारतातील मोदींचे सरकार हिंदु वर्चस्ववादी आणि फॅसिस्ट प्रवृत्तीचे सरकार असून मोदींच्या हातात भारतातील अण्वस्त्रे सुरक्षित आहेत काय याचा आंतरराष्ट्रीय समुदायाने विचार केला पाहिजे असे आवाहन करीत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आता नवीन कांगावा सुरू केला आहे. आजवर पाकिस्तानची अण्वस्त्रे तेथील दहशतवाद्यांच्या हातात पडण्याचा धोका आहे अशी ओरड आंतरराष्ट्रीय पातळीवरून सातत्याने होत होती. तोच मुद्दा आता भारतावर उलटवण्याचा प्रयत्न इम्रानखान यांनी चालवला आहे असे दिसून येत आहे.

प्रथम अण्वस्त्रांचा वापर करणार नाही हे भारताचे धोरण आता परिस्थितीनुसार बदलू शकते असे विधान भारताचे संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी केले होते. त्या पार्श्‍वभूमीवर इम्रान खान यांनी ट्विटरवरून हा कांगावा केला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून भारतातील मुस्लिमांना डांबुन ठेवले जात असून त्यांचे नागरीकत्वही रद्द केले जात आहे, संघाचे गुंड सुसाट सुटले आहेत त्यांना थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने प्रयत्न केले नाहीत तर ही स्थिती आणखीनच चिघळत जाईल अशी मुक्ताफळेही त्यांनी उधळली आहेत.

भारतातील अण्वस्त्रे आता फॅसिस्ट शक्तींच्या हातात गेली असून त्याचा गैरवापर थांबवण्यासाठी जगाकडूनच प्रयत्न व्हायला हवेत. त्यांच्यापासून केवळ प्रादेशिकच नव्हे तर जागतिक धोकाहीं उद्‌भवू शकतो असेही त्यांनी आपल्या ट्विटर अकौंटवर म्हटले आहे. मोदींच्या राजवटीचा उल्लेख त्यांनी हिंदु वर्चस्ववादी राजवट असा केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.