Narendra Modi Meets CJI DY Chandrachud । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या घरी जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. सरन्यायाधीश आणि पंतप्रधानांमध्ये झालेल्या या भेटीनंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. अनेकांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. मात्र, आता यावर स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्युत्तर दिलं आहे.
नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये आज वर्ध्यामध्ये विश्वकर्मा योजनेतील एक लाख लाभार्थ्यांना डिजिटल आयडी, डिजिटल स्किल सर्टिफिकेट देण्यात आले. 75 हजार लाभार्थ्यांना डिजिटल स्वरूपात कर्ज मंजूर करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये भाषण करताना पंतप्रधानांनी सरन्यायाधीस धनंजय चंद्रचूड यांच्या घरी गणरायाच्या आरतीला गेल्याने झालेल्या वादावर भाष्य करत काँग्रेसवर निशाणा साधला.
यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “देशातील सर्वात भ्रष्ट परिवार म्हणजे काँग्रेसमधील शाही परिवार आहे,” असं म्हणत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. गणपती पुजेसाठी काँग्रेसचा विरोध आहे. टिळकांनी गणेशोत्सव देशाच्या एकतेसाठी सुरू केला. काँग्रेसला गणेश पुजेचीही चीड आहे. मी गणेश पुजेसाठी गेलो तेव्हा त्यांचं तुष्टीकरणाचं काम सुरु झालं,” अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली.
तसेच पुढे बोलताना पंतप्रधानांनी, “काँग्रेस सरकारने कर्नाटकात गणपतीलाही जेलमध्ये टाकलं, महाराष्ट्र गणपतीची आराधना करतो. देशात गणपतीच्या अपमानवरून संताप आहे. काँग्रेसचे नेते यावर बोलले नाहीत. याला आपल्याला उत्तर द्यायचं आहे. आपण सर्व सोबत मिळून महाराष्ट्राचा गौरव वाढवू, स्वप्न पूर्ण करू,” असं आवाहन उपस्थितांना केलं.
काँग्रेसपासून सावध राहा
काँग्रेसपासून सावध राहा. काँग्रेसने केवळ भ्रष्टाचार वाढवला आहे. देशातील सर्वात भ्रष्ट पार्टी काँग्रेस आहे. देशातील सर्वात भ्रष्ट पार्टीचं कुटुंब म्हणजे काँग्रेसचं शाही कुटुंब आहे. त्यामुळे काँग्रेसपासून सावध राहा. त्यांना पुन्हा सत्तेत येण्याची संधी देऊ नका. नाही तर ते पुन्हा तुम्हाला बरबादीकडे घेऊन जातील, असं मोदी म्हणाले.