चित्तोड – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची तुलना ‘बाहुबली’ चित्रपटात विरोधी भूमिका निभावणाऱ्या भल्लाळदेव सोबत केल्याने, आता तुलना चंद्राबाबू नायडू यांनी नरेंद्र मोदींचा उल्लेख दहशतवादी असा केला आहे.
चंद्राबाबू नायडू यांनी चित्तोड येथे बोलताना हे वक्तव्य केले आहे. नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना चंद्राबाबू नायडू यांनी नरेंद्र मोदी हे एक कट्टर दहशतवादी आहेत, ते चांगले नागरिक नाहीत असे म्हंटले आहे. तसेच पुढे बोलताना, जर तुम्ही नरेंद्र मोदींना मत दिले तर नव्या समस्या निर्माण होतील, नरेंद्र मोदींनीच तिहेरी तलाक कायदा आणला असून तुम्हाला जेलमध्ये पाठवण्याची त्यांची योजना असल्याचे चंद्राबाबू नायडू म्हणाले.
यावेळी चंद्राबाबू नायडू यांनी २००२ च्या गुजरात दंगलीचा उल्लेख करत त्यावेळी नरेंद्र मोदींच्या राजीनाम्याची मागणी करणारा मी पहिला होतो असे सांगितले. याआधी नरेंद्र मोदी यांनी वारंवार टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्यावर टीका करत ‘यु-टर्न बाबू’ असल्याचा टोला लगावला होता.