नवी दिल्ली -महाराष्ट्र, हरियाणा या राज्यांत लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या रणधुमाळीसाठी भाजपबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदीही सज्ज झाल्याचे स्पष्ट होत आहे. लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवून भाजपने केंद्राची सत्ता राखली. त्यानंतर त्या पक्षाला विधानसभा निवडणुकांच्या माध्यमातून पुन्हा जनमताला सामोरे जावे लागणार आहे.
निवडणुका राज्यांच्या असल्या तरी त्या लढवताना भाजपची पूर्ण मदार पुन्हा मोदींच्या करिष्म्यावर असेल. त्याची जाणीव असल्याने मोदींनीही संबंधित राज्यांचे दौरे सुरू केले आहेत. विविध प्रकल्पांच्या उद्घाटनांसाठी त्यांनी शनिवारी महाराष्ट्राचा दौरा केला. आता उद्या (रविवार) ते हरियाणाचा दौरा करणार आहेत. त्या दौऱ्यावेळी ते भाजपने रोहतकमध्ये आयोजित केलेल्या विजय संकल्प सभेला उपस्थित राहतील. त्या सभेच्या माध्यमातून मोदी स्वपक्षाच्या हरियाणातील प्रचारमोहिमेचा प्रारंभ करतील.
मोदी सरकारने दुसऱ्या कार्यकाळात महत्वपूर्ण निर्णय घेत धडाकेबाज सुरूवात केली. सरकारच्या त्या निर्णयांमध्ये जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द करण्याच्या पाऊलाचाही समावेश आहे. त्या निर्णयावरून कॉंग्रेसमध्येही वेगवेगळे सूर उमटले. त्यामुळे त्या निर्णयाला प्रचाराचा मुद्दा बनवण्यासाठी भाजपला आणखीच बळ मिळाले आहे. विरोधकांची फाटाफूट, विरोधी पक्षांना लागलेली गळती आदींमुळे भाजपचा उत्साह आधीपासूनच दुणावला आहे. त्यातून तो पक्ष जोमाने विधानसभा निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी तयार असल्याचे सूचित होत आहे.