बदनामीच्या भीतीने आखाडा परिषदेच्या नरेंद्र गिरींची आत्महत्या; धक्कादायक माहिती उघड

नवी दिल्ली, – अखील भारतीय आखाडा परिषदेचे मरण पावलेले अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी हे त्यांचे शिष्य आनंद गिरी, पुजारी अध्यप्रसाद तिवारी आणि त्यांचा मुलगा संदीप तिवारी यांच्यामुळे प्रचंड मानसिक तणावाखाली होते. त्यातून अपमान आणि बदनामी टाळण्यासाठी त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे सीबीआयने आपल्या आरोपपत्रात म्हटले आहे.

नरेंद्र गिरी यांच्या आत्महत्येपुर्वीचा एक व्हिडिओ सीबीायने ताब्यात घेतला आहे. त्यात नरेंद्र गिरी म्हणतात, आपल्या एका महिलेसोबत एका संपादित केलेल्या व्हिडिओत दाखवून हा व्हिडिओ आनंद गिरी प्रसारित करणार आहेत.

सीबीआयने 20 नोव्हेंबरला दाखल केलेल्या आरोपपत्रात अलाहाबाद येथील बडे हनुमान मंदिराचा पुजारी आनंद गिरी, अध्य प्रसाद तिवारी आणि संदीप तिवारी यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. हे सर्वजण आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून न्यायालयीन कोठडीत आहेत.

देशातील संतांच्या सर्वात मोठ्या संघटनेचे अध्यक्ष असणारे नरेंद्र गिरी हे त्यांच्या शिष्यांना 20 सप्टेंबर रोजी संशयास्पद अवस्थेत मरण पावल्याचे आढळले होते. नरेंद्र गिरी हे प्रचंड मानसिक तणावाखाली असल्याचे बोलले जात असल्याने सीबीआयने गिरी यांनी अनेकांशी केलेले संभाषण तपासले होते.

आनंद गिरी हा आपला महिलेसोबत असणारा संपादित केलेला व्हिडिओ प्रसारीत करेल. त्यामुळे आपल्या प्रतिमेला धक्का पोहोचेल असे त्यांना वाटत होते. त्यांनी व्हिडिओत एकाचा चेहरा दुसऱ्याच्या चेहऱ्यावर डकवता येतो का? अशी विचारणा आपल्या शिष्यांना केली होती, असे आरोपपत्रात म्हटले आहे.

आत्महत्या करण्याआधी काही तास नरेंद्र गिरी यांनी 20 सप्टेंबरला सकाळी आपल्या शिष्यांना वाराणसीत बोलावून घेतले होते. महंत संतोष दास यांच्याकडे विश्‍वासार्ह माहिती होती की आनंद गिरी यांच्याकडे संगणकावर बनवलेला एक व्हिडिओ आहे. त्यात नरेंद्र गिरी एका महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत आहेत, असे आरोप पत्रात म्हटले आहे.

आनंद गिरीने हा व्हिडिओ अलहाबादमध्ये दोन जणांना आणि हरिद्वारमध्ये एकाला दाखवला होता. तो त्याची क्‍लिप व्हायरल करण्याच्या तयारीत होता, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.

नरेंद्र गिरी आणि आनंद गिरी यांच्या असणाऱ्या वादाचा संपूर्ण तपशील देऊन त्यामुळे महंत नरेंद्र गिरी यांनी आपले मृत्यूपत्र बदलले. नरेंद्र गिरी यांनी आपला बाघंबरी मठाचा वारस म्हणून बलबीर गिरी यांचा उल्लेख केला होता. त्यानंतर त्यांनी आनंद गिरी यांचे नाव वारस म्हणून घेतले आणि पुन्हा बलबीर गिरी यांचे नाव घेतल्याचे त्यात म्हटले आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.